क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू प्रशिक्षक अथवा समालोचक बनतात तर काही खेळाडू उपजीविका चालवण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय करण्यावर भर देतात. मात्र, भारतीय क्रिकेट संघातला एक माजी खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर अभिनेता बनला. ज्याने आपल्या कारकिर्दीत वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर सारख्या धुरंदर गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. सदगोपन रमेश असे त्या खेळाडूचे नाव आहे.
पाकिस्तानची केली धुलाई
डाव्या हाताने फलंदाजी करणार्या तमिळनाडूच्या सदगोपन रमेशने न्यूझीलंड आणि पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध खेळताना नेहमीच उत्कृष्ट खेळी केली. रमेशने जानेवारी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेत त्याने दमदार कामगिरी करत 2 अर्धशतके ठोकत 204 धावा केल्या. वास्तविक पाहता, सदगोपन रमेश हा मधल्या फळीतील फलंदाज होता पण भारतीय संघातील सलामीचा फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यानंतर सलामीची जबाबदारी रमेशवर आली.
आशिया चषक गाजवले
आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत सलामीला खेळताना त्याने काही दमदार खेळी देखील केल्या. आशिया चषक स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीची झलक दाखवत एक शतक व एक अर्धशतक ठोकत 292 धावा केल्या. पण रमेशला आपल्या कामगिरीत सातत्य टिकवता आले नाही. त्यामुळे त्यांची कारकीर्द वाढली नाही .
भारताकडून खेळताना त्याने 19 कसोटी सामन्यात 37.97 च्या सरासरीने 1367 धावा केल्या तर वनडेमध्ये 24 सामन्यात 28 च्या सरासरीने 646 धावा त्याच्या नावावर आहेत.
पहिल्या चेंडूवर घेतली विकेट
सदगोपन रमेशच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद देखील आहे. रमेश हा असा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने वनडे मध्ये गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. सिंगापूर येथे वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर निक्सन मॅक्लिन याला बाद करत हा विक्रम केला. तो त्याचा पहिलाच वनडे सामना नव्हता. परंतु त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत तेव्हा टाकलेला तो पहिलाच चेंडू होता.
निवृत्तीनंतर अभिनयात करिअर
सदगोपन रमेशच्या मते, ” त्याला भारतीय संघाकडून कमीत कमी पन्नास कसोटी सामने खेळायचे होते. मात्र, त्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची कारकीर्द वाढली नाही, म्हणून त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.” निवृत्तीनंतर रमेश तमिळ चित्रपटात आपले नशिब आजमावू लागला. 2008 साली संतोष सुब्रह्मण्यम या चित्रपटात काम केले. त्यानंतर पोटा- पोटी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत तो दिसून आला.