गुरुवार रोजी (०५ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये जबरदस्त खेळ दाखवत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. भारताने ५-४ ने जर्मनीला पराभवाची धूळ चारत हा सामना जिंकला. यासह तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. विजयाचा आनंद साजरा करत असताना भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचा एक नवा आदर्श देखील घालून दिला.
भारतीय खेळाडूंची खिलाडूवृत्ती
हे ऐतिहासिक पदक मिळविल्यानंतर भारतीय खेळाडू जल्लोष करत होते. दुसरीकडे, चार वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अश्रू आवरत नव्हते. त्यावेळी भारताचा युवा स्ट्रायकर हार्दिक सिंग याने जर्मनीचा अनुभवी हॉकीपटू निको वेलन याचे सांत्वन करत पाठ थोपटली. त्याचे हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते हार्दिकचे कौतुक करत आहेत.
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
मॉस्को ऑलिम्पिक १९८० नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदकाचा सामना खेळत असलेल्या भारतीय हॉकी संघाने या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. उपांत्य फेरीत बेल्जीयमकडून पराभूत झाल्यानंतर भारताला जर्मनीविरुद्ध विजय मिळवून कांस्य पदक जिंकण्याची संधी होती. मात्र, पहिल्या क्वार्टरमध्ये गोल करून जर्मनीने आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजित सिंगने भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर, जर्मनीने दोन मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत आघाडी ३-१ अशी वाढवली.
जर्मनीने आघाडी घेतली असली तरी सलगपणे मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हार्दिक सिंग व हरमनप्रीत सिंग यांनी गोल करत संघाला पुन्हा एकदा जिंकण्याची संधी निर्माण केली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर अनुभवी रुपिंदरपाल सिंगने गोल करून भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर सिमरनजितने आपला दुसरा गोल झळकावत भारताच्या जिंकण्याच्या आशा उंचावल्या. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने आणखी एक गोल करत सामन्यात रंगत आणली. मात्र, ते भारतीय खेळाडूंच्या भक्कम बचावामुळे बरोबरी साधू शकले नाहीत व हा सामना भारताने ५-४ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या –
चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक
भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना