भारतानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. रँकिंग फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी टॉप-4 मध्ये राहून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता भारतीय पुरुष संघासाठी पदक जिंकण्याचा मार्ग सोपा दिसत आहे, कारण अंतिम फेरीपूर्वी भारताचा सामना जागतिक क्रमवारीतील नंबर-1 संघ दक्षिण कोरियाशी होणार नाही.
पात्रता फेरीत भारताच्या धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी एकूण 2013 गुण मिळवून तिसरं स्थान पटकावलं. भारताला तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आलं आहे, जिथे संघाचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्याशी होईल. तुर्की रँकिंग फेरीत सहाव्या तर कोलंबिया अकराव्या स्थानावर राहिला होता. नियमांनुसार, पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर असलेल्या संघांना उपांत्यपूर्व फेरीचं आव्हान पार करून टॉप-8 मध्ये स्थान मिळवता येतं.
भारतीय पुरुष संघाचा मार्ग सोपा आहे, कारण संघाला अंतिम फेरीपर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाचा सामना करावा लागणार नाही. भारतानं उपांत्यपूर्व फेरीचं आव्हान पार केलं, तर उपांत्य फेरीत फ्रान्स, इटली किंवा कझाकस्तानशी सामना होऊ शकतो. या वर्षी भारतीय संघानं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलं होतं, हे विशेष.
तिरंदाजीमधील सुवर्ण पदकाचा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारताला पहिलं पदक मिळू शकतं. दुसरीकडे, भारतीय महिला संघाचा मार्ग मात्र अवघड आहे. भारतीय महिलांनी जर उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला, तर संघाचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण कोरियाशी होऊ शकतो. दक्षिण कोरियाचा महिला संघ देखील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
हेही वाचा –
महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचाच दबदबा, रेकॉर्ड असा की विश्वासच बसणार नाही!
पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा
नीता अंबानींची पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड