जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या दिमाखदार स्पर्धेतून दरवर्षी अनेक युवा प्रतिभावंत खेळाडू पुढे येतात आणि नाव कमावतात. मात्र, अनेकदा असे होते की, एक-दोन सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एखादा खेळाडू तशीच कामगिरी करू शकत नाही. अशा या खेळाडूंवर ‘वन मॅच वंडर’ असा शिक्का बसतो. आज आपण आयपीएलमधील अशाच ‘वन मॅच वंडर’ ठरलेल्या भारतीय खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) पॉल वॉल्थटी
आयपीएल २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने पहिले खेळताना पंजाबसमोर १८९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा सलामीवीर पॉल वॉल्थाटीने ६३ चेंडूत १२० धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने आपल्या खेळीदरम्यान १९ चौकार आणि २ शानदार षटकार लगावले. मात्र, या एक सामन्यानंतर तो कधीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.
२) कामरान खान
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून कामरान खान हा युवा गोलंदाज खेळला होता. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाला शेन वॉर्नने शोधले होते. हंगामातील दुसऱ्या सामन्यातच सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्ध ४ षटकात १८ धावा देऊन तीन गडी बाद केले होते. हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही त्याने गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
मात्र, या सामन्यानंतर तो लक्षात राहील अशी कामगिरी करू शकला नाही. पुढे, २०११ मध्ये तो पुणे वॉरियर्स इंडियाचा भाग बनला मात्र तिथेही तो अपयशी ठरला.
३) मनविंदर बिस्ला
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या मनविंदर बिस्ला याचा ‘वन मॅच वंडर’ खेळाडूंमध्ये समावेश होतो. बिस्लाने आयपीएल २०१२ च्या अंतिम सामन्यात केकेआरसाठी ४८ चेंडूंत ८९ धावांची शानदार खेळी खेळली आणि आपल्या संघाला आयपीएल २०१२ चा विजेता बनविले.
बिस्लाने या तुफानी खेळीदरम्यान ८ चौकार आणि ५ षटकार ठोकले होते, परंतु, या खेळीखेरीज तो आयपीएलमध्ये कधीही विशेष काही करू शकला नाही.
४) अभिषेक नायर
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर याने आपल्या आयपीएल कारकिर्दी दरम्यान लक्षात राहील अशी केवळ एक खेळी खेळली. २००९ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना १४ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली होती. या खेळी दरम्यान त्याने इंग्लंडचा अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफला सलग ३ षटकार ठोकलेले.
त्यानंतर, नायर पुणे वॉरियर्स इंडिया व राजस्थान रॉयल्स या संघांसाठी खेळला. मात्र, त्या पहिल्या सामन्यासारखी खेळी त्याला पुन्हा खेळत आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
आयपीएल अपडेट | आरसीबीच्या ताफ्यात नव्या शिलेदाराची एन्ट्री, टी२०त खोऱ्याने ओढतो धावा