नुकताच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी२० मालिकेतील पहिला सामना (First T20) पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर वेस्ट इंडिजचे लक्ष्य पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला. या सामना विजयासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध खास शतकही (India’s 100th International Win Against WI) केले आहे.
असा झाला सामना
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५७ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक निकोलस पूरन याने झंझावाती अर्धशतकी खेळी केली होती. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज ५० धावा करू शकला नाही.
भारताकडून या डावात पदार्पणवीर रवी बिश्नोई याने स्वप्नवत कामगिरी केली. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना केवळ १७ धावा देत २ विकेट्स काढल्या.
प्रत्युत्तरात रोहित शर्माने कर्णधार खेळी केली. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने झंझावाती ४० धावा केल्या. त्याच्या साथीला सलामीवीर इशान किशनने ३५ धावा जोडल्या. तर सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांनी अंतिम षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. सूर्यकुमार ३४ धावांवर नाबाद राहिला. तर वेंकटेश अय्यरने नाबाद २४ धावा केल्या. परिणामी भारताने १९ व्या षटकातच हा सामना खिशात घातला.
भारतीय संघाचे विशेष शतक
या सामना विजयासह भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध १०० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा आकडा गाठला आहे. तसेच भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा केवळ तिसरा संघही बनला आहे. भारतापूर्वी इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ११३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघ या यादीत अव्वलस्थानी असून त्यांनी आतापर्यंत वेस्ट इंडिजला १४१ आंतरराष्ट्रीय सामन्यात चितपट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाय डगमगले आणि फुकटात षटकार दिला; पण बिश्नोई पुढे असा जबरदस्त खेळला की, मोठी चूकही किरकोळ वाटेल!!
ईडन गार्डन्सवर पाऊल ठेवताच रोहितच्या नावे ‘खास’ विक्रमाची नोंद