वनडे विश्वचषक 2023 चा महाकुंभ भारतीय भूमीवर मागील वर्षी खेळला गेला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना भारतीय संघाने 6 विकेटने गमावला. त्यामुळे करोडो भारतीयांचे स्वप्न भंगले. भारतीय संघाने विश्वचषक गमावला असला तरी, विश्वचषकाचा भारताला फायदा झाला आहे. बुधवारी आयसीसीने जारी केलेल्या अहवालानुसार, भारतात झालेल्या वनडे विश्वचषकाने 1.39 अब्ज डॉलर्सचा आर्थिक लाभ झाला. ज्यापैकी पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फायदा झालेला दिसून येतो.
वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये खेळला गेला. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. आयसीसीच्या अहवालात म्हटले आहे की, ‘वनडे विश्वचषक 2023 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रिकेट विश्वचषक होता. ज्याने विकासाला हातभार लावला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरला.’
आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, क्रिकेट विश्वचषक 2023 ने क्रिकेटची महत्त्वपूर्ण आर्थिक शक्ती प्रदर्शित केली आहे. ज्यामुळे भारतासाठी 1.39 अब्ज डॉलर्स (11,637 कोटी रुपये) आर्थिक फायदा झाला. यजमान शहरांमध्ये 861.4 दशलक्ष डॉलर्स पर्यटन महसूल मिळाला. यामध्ये प्रवास, भोजन आणि निवास यांचा समावेश आहे. कारण सामन्यांसाठी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले होते. अहवालात दावा करण्यात आला आहे की, 12 लाख 50 हजार प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये विश्वचषक पाहिला. त्यापैकी सुमारे 75 टक्के प्रेक्षक प्रथमच विश्वचषक पाहण्यासाठी आले होते.
आयसीसीच्या माहितीनुसार, मुलाखत घेतलेल्या विदेशी चाहत्यांपैकी 55 टक्के चाहत्यांनी यापूर्वी नियमितपणे भारताला भेट दिली होती. तर 19 टक्के परदेशी चाहत्यांनी विश्वचषकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारताला भेट दिली. परदेशी प्रवाशांनी त्यांच्या मुक्कामादरम्यान अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. परिणामी 281.2 दशलक्ष डॉलर्स आर्थिक फायदा झाला. स्पर्धा आयोजित करण्यासाठी तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इतर संस्थांद्वारे 48,000 हून अधिक पूर्ण आणि अर्धवेळ नोकऱ्या निर्माण झाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवू शकतो”, अमेरिकेच्या गोलंदाजाने व्यक्त केला विश्वास
IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था
बांग्लादेश टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या ॲक्शनमध्ये; Photos