हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला सामना उद्या दुपारी १ वाजून ३० मिनीटांनी हैद्राबाद येथे सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा १५ फेब्रुवारी रोजीच करण्यात आली आहे.
या मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार रोहित शर्माची सर्वच सामन्यांत निवड झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांत संधी देण्यात आलेल्या सिद्धार्थ कोलला शेवटच्या तीन सामन्यांत मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या ऐवजी भुवनेश्वर कुमार संघात पुनरागमन करेल. बाकी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जखमी हार्दिक पंड्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
उद्या अर्थात 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
सर्व वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.
असा आहे पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ- विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत
असा आहे उर्वरित तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ-विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, विजय शंकर, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेद्र चहल, रिषभ पंत
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या वनडेत धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडियाला मोठा धक्का
–मुंबईकर रोहित शर्मासाठी उद्याचा वनडे सामना ठरणार खास
–एकाच दिवसात झाली तब्बल ६८ षटकारांची बरसात…