बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली. जुलै महिन्यात हा दौरा होणार असून यात मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मात्र जुलै महिन्यात भारताचा संघ इंग्लंड दौर्यावर असेल. १८ ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळवल्या गेल्यावर ऑगस्ट महिन्यातील इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ तिथेच थांबेल.
अशावेळी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीतच भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर जाईल हे स्पष्ट आहे. मात्र त्यामुळे आता नेतृत्व कोणाकडे असेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. या निमित्ताने आजच्या लेखात आपण भारतीय संघाकडे उपलब्ध असलेल्या नेतृत्वाच्या पर्यायांचा आढावा घेऊया.
१) शिखर धवन – कोहली आणि रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन हा संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू असेल. हा डावखुरा सलामीवीर सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार फॉर्मात देखील आहे. यापूर्वी आशिया कप २०१८ मध्ये त्याने भारताच्या उपकर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे येत्या श्रीलंका दौर्यातही त्याला नेतृत्व दिले जाऊ शकते.
२) केएल राहुल – केएल राहुलकडे भारताचा भविष्यातील आश्वासक खेळाडू म्हणून पाहिले जाते. जर दुखापतीच्या समस्येमुळे तो इंग्लंड दौर्यावर जाऊ शकला नाही तर श्रीलंका दौर्यावरील भारतीय संघात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुललाच उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. याचा अर्थ त्याला कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे श्रीलंका दौर्यावर भारतीय संघाची कमान सांभाळण्याची जबाबदारी राहुलच्या खांद्यावर दिली जाऊ शकते.
३) भुवनेश्वर कुमार – भुवनेश्वर कुमार हा अजून एक कर्णधार पदाचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. यापूर्वी त्याने भारतीय संघासाठी कधी कर्णधार पदाची जबाबदारी घेतली नाही आहे. पण आयपीएल २०१९ मध्ये केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत त्याने सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्व केले होते. याशिवाय मैदानावर शांत डोक्याने निर्णय घेण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचा अनुभव आणि स्वभाव पाहता त्याच्याकडे देखील भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.
४) रिषभ पंत – रिषभ पंतने गेल्या काही महिन्यात अविश्वसनीय कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व देखील यशस्वीपणे केले आहे. पंतच्या कर्णधार पदाखाली यंदा दिल्लीचा संघ हंगाम स्थगित झाला त्यावेळी पॉईंट्स टेबल मध्ये अव्वल स्थानी होता. त्याच्या याच प्रदर्शनाने पंत भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार झाला आहे. याशिवाय विकेटकीपर असल्याचा फायदाही त्याला या शर्यतीत होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या मोठ्या पुरस्कारामध्ये बाबर आझमने मारली बाजी; या क्रिकेटपटूंना टाकले मागे
पॅट कमिन्सने नजरचुकीने मयंती लँगरऐवजी केले मयंक अगरवालला केले टॅग, मग मिळाला असा रिप्लाय
मास्टरप्लॅन! कर्णधार रिषभ पंतने एमएस धोनीला बाद करण्यासाठी आवेश खानला केली अशाप्रकारे मदत