भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीवर ‘साकारात्मक गोष्टी बघा, भारतीय संघाने २० बळी घेतले आहेत’, असे म्हटले आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या पराभवांमुळे भारतीय संघावर आणि कर्णधार विराट कोहलीवर टीका होत आहे.
अशावेळी धोनीने संघाला पाठिंबा दाखवला आहे. तो म्हणाला, “माझं असं म्हणणं आहे की साकारात्मकतेकडे बघा. कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० बळी घेण्याची गरज असते आणि आपण ते २० बळी घेतले होते. जर तुम्ही २० बळी घेतले नाहीत तर तुम्ही पुढे काय करता? तुम्ही सामना अनिर्णित राखण्याचा विचार करता.”
“तुम्ही एखादा कसोटी समान एकतर कमी धावा देवून किंवा चांगल्या धावा करून अनिर्णित राखू शकता.”
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताला या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
धोनी पुढे म्हणाला, ” जरी तुम्ही भारतात खेळत असला किंवा भारताबाहेर खेळत असला तरी तुम्ही जर २० बळी घेऊ शकला नाही तर तुम्ही कसोटी सामना जिंकू शकत नाही. आपण २० बळी घेतले होते ही एक सकारात्मक गोष्ट आहे. याचा अर्थ आपण नेहेमीच कसोटी सामना जिंकण्याच्या स्थितीत होतो. जेव्हा तुम्ही धावा करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही विजयीही व्हाल.”
धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो भारतीय संघाकडून फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळतो. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना २४ जानेवारीपासून सुरु होणार आहे.