मंगळवारी (०२ फेब्रुवारी) अँटिग्वा येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचा (U19 World Cup) उपांत्य सामना (Semi Final) झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ विकेट्सच्या नुकसानावर २९० धावा केल्या. परिणामी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९१ धावांचे मोठे आव्हान मिळाले. या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९४ धावांवर गडगडला. त्याचबरोबर भारतीय संघाने ९६ धावांनी दणदणीत विजय साजरा करत सलग चौथ्या वेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली.
यानंतर आता भारताचा संघ ५ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल. भारतीय संघाला इथपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा कर्णधार यश धूल (Yash Dhull) याचा मोठा वाटा राहिला आहे. परंतु यशसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा (Yash Dhull’s Story) राहिलेला नाही.
कोरोनामुळे २ सामन्यांना मुकला यश
यशने १९ वर्षांखालील विश्वचषकातील पहिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळला होता. परंतु पुढे तो कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने त्याला पुढील दोन्ही साखळी फेरी सामन्यांना मुकावे लागले होते. उपांत्यपूर्व सामन्यातून त्याने संघात पुनरागमन केले होते. तर उपांत्य फेरी सामना हा त्याचा तिसराच सामना होता आणि याच सामन्यात त्याने यंदाच्या विश्वचषकातील आपले पहिले शतक झळकावले. उपांत्य सामन्यात यशने ११० चेंडूत ११० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीदरम्यान १ षटकार आणि १० चौकार मारले. सोबतच त्याने तिसऱ्या विकेटसाठी शेख राशिदबरोबर द्विशतकी भागिदारीही केली. त्याच्या या योगदानामुळेच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला.
मुलासाठी वडिलाने सोडली होती नोकरी
यशच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्याच्या कुटुंबीयाचे महत्वाचे योगदान राहिले आहे, त्यांने नेहमीच यशला समर्थन केले आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी मदत केली. यशचे कुटुंब दिल्लीत असते. यशने यापूर्वी १६ वर्षाखील संघात असल्यापासून दिल्लीचे नेतृत्व केले आहे. यशच्या वडिलांना त्याच्यासाठी स्वतःची नियमित नोकरी सोडावी लागली होती, ते सध्या एका औषध कंपनीत कार्यरत आहेत.
यशच्या क्रिकेटची सुरुवात त्याच्या घराच्या छतावरून झाली होती. तो लहान असताना त्याने घरावर क्रिकेट खेळायचा सुरुवात केली. तेथुनच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने क्रिकेटचा प्रवास सुरूच ठेवला. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने दिल्लीच्या १४ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये देखील मुलाविषयी एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. यानंतर त्यांना विश्वास वाटू लागला की, आता शिक्षणाकडे थोडे कमी लक्ष दिले तरी चालू शकते.
यशच्या वडिलांना मुलासाठी घेतलेल्या संघार्षाची माहिती स्वतः दिली होती. यशच्या वडिलांचे नाव विजय असून, त्यांनी जेव्हा नोकरी सोडली होती, तेव्हा यशच्या आजोबांच्या पेंशनवर घरखर्च भागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यशचे आजोबा भारताचे निवृत्त सैनिक आहेत. यशला खेळण्यासाठी लागणारी साधणे पुरवण्यासाठी कटुंबीयांनी त्यावेळी घरखर्च देखील कमी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकवीर यश धूलच्या खेळीवर वडिल म्हणाले, ‘कष्टाचं चीज होताना दिसतंय’; फायनलसाठी मोलाचा सल्लाही दिला
मोठ्या मनाचा कर्णधार! विजयाचे श्रेय दिले अन्य खेळाडूंना