भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आज (8 मार्च) तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. हरमनप्रीतनं क्रिकेट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून सध्याच्या काळात तिची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते. 8 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ देखील साजरा केला जातो. त्यामुळे हरमनप्रीतसाठी हा दिवस आणखी खास आहे.
हरमनप्रीत कौरचा जन्म 8 मार्च 1989 रोजी पंजाबमधील मोगा येथे झाला. हरमन टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला आदर्श मानते. हे तिच्या फलंदाजीतही स्पष्ट दिसतं. उजव्या हाताची आक्रमक फलंदाज असण्यासोबतच ती एक उपयुक्त गोलंदाजही आहे. हरमननं तिच्या 20 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केलं. त्यानंतर 2009 च्या टी-20 विश्वचषकात तिनं इंग्लंडविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
2016 मध्ये हरमनप्रीत कौर भारतीय महिला टी20 संघाची कर्णधार बनली. दिग्गज खेळाडू मिताली राजच्या निवृत्तीनंतर ती आता कसोटी आणि वनडेमध्येही भारतीय महिला संघाचं नेतृत्व करत आहे. हरमन विदेशी टी 20 लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. जून 2016 मध्ये ‘सिडनी थंडर्स’नं हरमनला बिग बॅश लिगसाठी साइन केलं होतं. आयपीएलमध्ये ती मुंबई इंडियन्सकडून खेळते.
हरमनप्रीत कौरचं नाव घेताच 2017 च्या महिला वनडे विश्वचषकाची आठवण येते. त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 चेंडूत नाबाद 171 धावांची शानदार खेळी खेळली होती. या स्फोटक खेळीत तिनं 20 चौकार आणि 7 षटकार हाणले. हरमनप्रीतच्या या खेळीने महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. एका वर्षानंतर, हरमननं टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूत शतक झळकावलं. या खेळीत तिनं 8 षटकार आणि 7 चौकार लगावले होते.
हरमनप्रीत कौरनं भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 130 एकदिवसीय आणि 161 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये हरमननं 18.71 च्या सरासरीनं 131 धावांसह 11 बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर 36.66 च्या सरासरीनं 3410 धावा आहेत. हरमननं वनडेमध्ये 5 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच या फॉरमॅटमध्ये तिच्या नावावर 31 विकेटही आहेत. टी 20 इंटरनॅशनलमध्ये हरमननं 27.62 च्या सरासरीनं 3204 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. हरमनप्रीतनं टी-20 इंटरनॅशनलमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत.
टी-20 कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा चांगला आहे. हरमननं 106 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. या दरम्यान भारतानं 59 सामने जिंकले आणि 42 सामने गमावले. तर एक सामना बरोबरीत राहिला. तसेच चार सामने अनिर्णित राहिले. रोहित-धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघानं 41-41 टी20 सामने जिंकले आहेत. तर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघानं 30 टी-20 सामने जिंकले होते. याशिवाय हरमनप्रीतनं 17 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
काय सांगता! क्रिकेटच्या देवाची विकेट Bigg Boss विजेत्या मुनवर फारुकीनं घेतली! पाहा Video