वडोदरा येथे भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती, त्यातील शेवटचा सामना शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी खेळला गेला. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघानं आधीच मालिका खिशात घातली होती. आता संघानं शेवटचा सामनाही जिंकून वेस्ट इंडिजचा 3-0 असा व्हाईटवॉश केला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ मोठ्या धावा करू शकला नाही. संपूर्ण संघ 38.5 षटकात 162 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघानं 28.2 षटकांत 167/5 धावा करून विजय मिळवला. फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्माच्या घातक गोलंदाजीनं भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ती आता भारतासाठी वनडेमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारी गोलंदाज बनली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांच्या पहिल्या 3 विकेट केवळ 9 धावांवर गेल्या होत्या. रेणुका सिंगनं सलामीवीर कियाना जोसेफ आणि कर्णधार हेली मॅथ्यूजला खातंही उघडण्याची संधी दिली नाही. तिनं डायंड्रा डॉटिन (5) हिला आपला तिसरा बळी बनवलं. येथून वेस्ट इंडिजचा डाव सांभाळण्याचं काम शमीन कॅम्पबेल आणि चिनेल हेन्री या जोडीनं केलं. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.
कॅम्पबेलनं 46 धावा केल्या आणि अर्धशतकाच्या जवळ आल्यावर ती बाद झाली. तर हेन्री अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरली. तिनं 61 धावांची खेळी खेळली. या दोघी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव पुन्हा एकदा अडखळला. आलिया ॲलन (21) वगळता उर्वरित फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. या कारणामुळे त्यांचा डाव 39व्या षटकातच संपला. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक सहा आणि रेणुका सिंगनं तीन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खास झाली नाही. शानदार फॉर्मात असलेली सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या 4 धावा करून बाद झाली. त्याच वेळी, गेल्या सामन्यातील शतकवीर हरलीन देओलच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. प्रतिका रावलही 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 22 चेंडूत 7 चौकार मारत 32 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जच्या बॅटमधून 29 धावा आल्या. यानंतर दीप्ती शर्मानं नाबाद 39 आणि ऋचा घोषनं नाबाद 23 धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं.
हेही वाचा –
बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटची छेड काढली, संतापलेल्या कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
शार्दुल ठाकूरच्या संघाची धमाकेदार कामगिरी! अवघ्या 33 चेंडूतच मिळवला शानदार विजय
यशस्वीचे शतक हुकले, तरीही केला खास विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे