भारतीय महिला क्रिकेटचं नाव काढलं, एका धाकड फलंदाजाचे नाव चटकन कोणाच्याही तोंडात येऊन जाते. कुणी तिला लेडी सेहवाग म्हणत होते, तर कुणी जगातील सर्वात स्फोटक फलंदाज. ती क्रिकेटपटू म्हणजेच भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा. ती येते, ती पाहाते आणि अन् ती जिंकते असंच काहीसं तिच्याबद्दल म्हणावं लागेल. तर मंडळी विरोधी संघातील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेली भारताची लेडी सेहवाग आज आपला १९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
शेफालीचा जन्म, हरियाणाच्या छोट्याशा रोहतक जिल्ह्यातला. २८ जानेवारी २००४ मध्ये जन्मलेल्या शेफालीला तिच्या कुटुंबातूनच क्रिकेटचा वारसा लाभला होता. तिचे वडील संजीव शर्मा यांना क्रिकेटची खूप आवड होती. परंतु आवश्यक पाठिंबा आणि परिस्थितीच्या अभावामुळे ते आपल्यातील प्रतिभेला न्याय देऊ शकले नाहीत. पण त्यांनी आपले अपूर्ण स्वप्न आपल्या लेकीच्या रुपात पूर्ण करण्याचे ठरवले. शेफालीलाही बालवयातच क्रिकेटचा लळा लागला. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला क्रिकेटचे धडे देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र तिची खरी कसोटी लागली ती, प्रोफेशेनल (व्यावसायिक) क्रिकेटचे प्रशिक्षण घेतेवेळी.
रोहतक हा जरी जिल्हा असला तरीही त्यावेळी तिथे मुलींसाठी कोणतीही क्रिकेटची अकादमी नव्हती. त्यामुळे वडिल संजीव यांनी जवळपासच्या मुलांच्या बऱ्याचशा क्रिकेट अकादमीत तिला भरती करण्यासाठी प्रयत्न केले. पण मुलांनी भरलेल्या अकादमीत एका मुलीला प्रशिक्षण देण्यास कोणीही होकार दिला नाही. अखेर या समस्येचे तोड काढण्यासाठी शेफालीने मुलाचे रुप घेण्याची शक्कल लढवली. तिने मुलांप्रमाणे आपले केस कापले आणि ९ वर्षीय शेफाली जवळच्या एका अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवू लागली.
एका मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाची कहाणी सांगताना शेफाली म्हणते, “मला क्रिकेटची लहानपणापासून आवड होती. त्यानुसार मी लहानपणीच या क्षेत्रात पाऊलही ठेवले. परंतु त्यावेळी भारतात महिलांना क्रिकेट क्षेत्रात जास्त वाव मिळत नसे. त्यामुळे मला भिती वाटत असायची की, असेच चालू राहिल्यास मी कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही. म्हणून मी वडिलांकडे माझे केस छोटे करण्याचा हट्ट केला. त्यांनी सुरुवातीला या गोष्टीला नकार दिला. परंतु माझ्या क्रिकेट कारकिर्दीसाठी त्यांनी शेवटी सहमती दर्शवली.”
भावाच्या जागी खेळली होती क्रिकेट
संजीव यांना शेफालीव्यतिरिक्त एक मुलगाही आहे. त्याचे नाव साहील असून तोही क्रिकेट खेळतो. मात्र शेफालीप्रमाणे त्याला अद्याप तितके यश साध्य करता आले नाही. आपल्या भावाबद्दलचा एक किस्सा शेफालीने सांगितला होता. स्थानिक पातळीवर मुलींचे क्रिकेट सामने होत नसल्याने तिला प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नसे. त्यामुळे एकदा तिचा भाऊ आजारी पडल्याने ती त्याचे कपडे घालून त्या सामन्यात स्पर्धेत सहभागी झाली होती. विशेष बाब म्हणजे, त्या सामन्यात शेफालीने धुव्वादार फलंदाजी करत संघाला सामना जिंकून दिला होता आणि ती ‘मॅन ऑप द मॅच’ पुरस्काराचीही मानकरी ठरली होती.
मास्टर ब्लास्टरला मानते आपला आदर्श
अनेक युवा क्रिकेटपटूंप्रमाणे शेफालीसाठीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आदर्श आहे. शेफालीने सचिनला २०१३ मध्ये हरियाणातील बन्सी लाल स्टेडीयममध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजी करताना पाहिले होते. तसेच ती मागीलवर्षी प्रत्यक्षात सचिनला भेटलीसुद्धा होती. या भेटीदरम्यानचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
वयाच्या १५ व्या वर्षी झाले भारतीय संघात पदार्पण
‘लेडी सेहवाग’ नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या शेफालीने २४ सप्टेंबर २०१९ला दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तिचे वय अवघे १५ वर्षे २३९ दिवस होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. या सामन्यात ती चौथ्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाली होती. पण असे असले तरीही तिने पुढील काही सामन्यातच तिचा आदर्श असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडला होता.
तिने ९ नोव्हेंबर २०१९ ला वेस्ट इंडिज महिला विरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक केले होते. त्यावेळी तिचे वय १५ वर्षे २८५ दिवस इतके होते. ती भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. हा विक्रम करताना तिने सचिन तेंडूलकरचा ३० वर्षे जूना विक्रम मोडीत काढला होता. सचिनने १६ वर्षे २१४ दिवस एवढे वय असताना २४ ऑक्टोबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक केले होते.
एवढेच नव्हे, नुकत्याच १६ ते १९ जून दरम्यान इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. हा सामना तिच्यासाठी अविस्मरणीय असा राहिला. या कसोटी पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात ९६ धावांची खेळी केली. ही कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूने पदार्पणात केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी करत ६३ धावा चोपत पहिल्याच कसोटी सामन्यातील दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली.
शेफालीने २०१९ साली टी२०द्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तिला जवळपास २१ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अर्थातच २०२१ मध्ये थेट कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. परंतू या काळात लॉकडाऊन व भारतीय महिला संघाला वनडे खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे तिचे वनडे पदार्पण अजूनही लांबले आहे. अशात शेफालीला वनडे संघात जागा मिळण्यासाठी किती दिवसांची, महिन्यांची किंवा वर्षांची प्रतिक्षा करावी लागेल? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीज दौऱ्यापूर्वी १ फेब्रुवारीला भारतीय संघ अहमदाबादमध्ये जमणार एकत्र, ‘असे’ असेल पुढील नियोजन
आयपीएलसाठी नावनोंदणी केलेल्या भूतानच्या ‘त्या’ एकमेव खेळाडूचे भारताशी आहे घट्ट नाते; घ्या जाणून
भारतीय क्रिकेटची ‘धाकड गर्ल’ शफाली वर्मा
हेही पाहा-