काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी लागली आहे. पोवार हे पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले असल्याची घोषणा गुरुवारी (13 मे) करण्यात आली. भारतीय महिला संघाचे नवे महागुरू बनलेल्या पोवार यांचा 43 वा वाढदिवस आहे.
पोवार यांनी यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर 2018 दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने 2018 सालच्या टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने सलग 14 टी20 सामनेही जिंकण्याची करामत केली होती. पण 2018 च्या महिला टी20 विश्वचषकानंतर मिताली राज आणि त्यांच्यातील वादामुळे अखेर ते प्रशिक्षकपदावरुन दूर झाले होते.
इंग्लंड दौऱ्याचे असेल आव्हान
दुसऱ्यांदा प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या पोवार यांच्यासमोर पहिले आव्हान हे इंग्लंड दौऱ्याचे असणार आहे. भारतीय महिला संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला संघाला १ कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यापूर्वी सहाय्यक कर्मचार्यांची निवड नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती करेल.
रमेश पोवार यांच्याविषयी थोडेसे…
–रमेश पवार हे 5 फूट 5 इंच उंचीचे उजव्या हाताचे माजी फिरकीपटू आहेत. त्यांचा भाऊ किरण पोवार हे आता 19 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत.
–शरिराने जाड पण तंदुरुस्त अशा पवार यांना 2000 साली बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत निवड झाली होती.
–पोवार यांनी त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबई संघाकडून केली. 2002-03च्या रणजी ट्रॉफी विजयात त्यांचा वाटा मोलाचा होता.
–सप्टेंबर 2003च्या इराणी ट्रॉफीत शेष भारतीय संघासारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळताना पोवार यांनी 61 धावा देत 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यांच्या विकेटमध्ये राहूल द्रविड, युवराज सिंग आणि सौरव गांगुलींसारख्या मोठ्या क्रिकेटपटूंच्या समावेश होता.
–देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीने त्यांना 2004च्या ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांनी 6 षटके गोलंदाजी करत 35 धावा देत एकही विकेट घेतली नव्हती.
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह पवार यांनी त्यांची देशांंतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चालू ठेवली. 2005-06मध्ये रणजी ट्रॉफीत पुनरागमन करत त्यांनी संपूर्ण हंगामात 63 विकेट्स घेतल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात 50पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती.
–आयपीएलच्या पहिल्या हंगामात रमेश यांची किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली होती. यावेळी पहिल्या सामन्याच्या पहिल्या षटकात विकेट घेण्याचा पराक्रम पवारांनी केला होता. त्यांनी पंजाबकडून 3 हंगाम घालवले आणि पुढे 2011मध्ये ते अनधिकृत कोची टस्कर्स केरळ संघात सामाविष्ट झाले. पुढे परत 2012ला त्यांनी पंजाबकडून आयपीएलचा हंगाम खेळला होता.
–प्रथम श्रेणीचे 14 हंगाम मुंबई संघाकडून घालवल्यानंतर पवारांनी 2013ला राजस्थान संघात प्रवेश केला. यावेळी 6 सामन्याचत त्यांनी 10 विकेट्स मिळवल्या होत्या.
–2014साली त्यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाली होती.
–नोव्हेंबर 2015मध्ये क्रिकेट सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.
-पोवार अन् मिताली वाद
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राजला 2018 सालच्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणानंतर मितालीनेही बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवारांवर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावरही तिने यांच्यावरही भेदभाव केल्याचा आरोप केला होता.
पण तिच्या या आरोपांना उत्तर देताना हे सर्व आरोप पोवार यांनी नाकारले. तसेच तिला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात न घेण्याचे कारण पोवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र या वादामुळे पोवार यांचे प्रशिक्षकपद कायम करण्यात आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये एकाच षटकात ५ खणखणीत षटकार ठोकत प्रकाशझोतात आलेला ‘राहुल तेवतिया’
त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!