भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकन महिला संघाशी लखनौ येथे पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक होते.
मात्र चांगली फलंदाजी करूनही गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. पहिल्या डावात भारताकडून पूनम राऊतने शतक झळकावले होते. पण ते व्यर्थ ठरले. त्यामुळे आता मालिकेतही दक्षिण आफ्रिकेने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात भारताची मजबूत फलंदाजी
आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय मिळवणे आवश्यक असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज ऐवजी या सामन्यात संधी मिळालेल्या प्रिया पुनिया आणि स्मृती मंधाना यांना फार खास कामगिरी करता आली नाही. १६व्या षटकात २ बाद ६१ अशी अवस्था असताना अनुभवी पूनम राऊतने कर्णधार मिताली राजच्या साथीने भारताचा डाव सावरला.
पूनमने आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक साकारताना १२३ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. तिला मिताली राजने ४५ तर हरमनप्रीत कौरने ५४ धावांची खेळी करत सुयोग्य साथ दिली. या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ४ बाद २६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तुमी सेखकुनेने सर्वाधिक २ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेने सहज गाठले लक्ष्य
भारताने दिलेले २६७ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला गाठणे सोपे नसेल, असे दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला वाटले होते. मात्र हा अंदाज खोटा ठरवत पाहुण्या संघाने अगदी सहज हे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. त्यांनी भारताच्या गोलंदाजांना निष्प्रभ करत चौफेर हल्ला चढवला.
त्यामुळे अवघ्या ४८.४ षटकातच त्यांनी ६ गडी राखून विजय मिळवला. आफ्रिकेकडून सलामीवीर लिझेल लीने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. भारताकडून मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. मात्र आजच्या सामन्यात विजय मिळवल्याने ही मालिका दक्षिण आफ्रिकेने खिशात घातली आहे. मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करणार? पहा काय म्हणाला
मुंबईविरुद्ध १५८ धावांची खेळी केलेल्या माधव कौशिकने एक-दोन नव्हे तब्बल ५ विक्रमांना घातली गवसणी
पृथ्वीने गाजवले मैदान! दुखापतीनंतरही तुफानी अर्धशतक ठोकत केला विश्वविक्रम