बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) भारतीय महिला क्रिकेट संघ व ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ९ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला होता. महिला क्रिकेटमधील टॉप थ्री पैकी एक असलेल्या भारतीय महिला संघाने उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठलेली. मात्र, एकवेळ संघ आघाडीवर असताना बॅटर्सनी कचखाऊ कामगिरी केल्याने भारताला पराभव पत्करावा लागला. मागील काही काळापासून भारतीय संघ सातत्याने अशाप्रकारे उपांत्य व अंतिम सामन्यात पराभूत होत आहे. त्यामुळे भारतीय महिला संघावर चोकर्सचा शिक्का बसला आहे.
मोक्याच्या सामन्यात कच खाण्याचा भारतीय महिला संघाचा हा इतिहास मागील पाच वर्षात सातत्याने दिसून येत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१७ वनडे विश्वचषकात शानदार कामगिरी करत मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम फेरी गाठलेली. अंतिम फेरीत भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करण्याच्या अगदी जवळ होता. मात्र, २८ धावांमध्ये लागोपाठ सहा बळी गेल्याने संघाला विश्वचषकापासून वंचित रहावे लागले.
त्यानंतर २०१८ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताला ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून मात देत स्पर्धेबाहेर केले. अगदी याचीच पुनरावृत्ती २०२० टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत झाली. एकही पराभव न पत्करता भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र, येथेही ऑस्ट्रेलियाने यजमानपदाचा लाभ घेत भारतीय संघाला हरवत विश्वचषक आपल्या नावे केला होता. यावर्षीच्या सुरुवातीला न्युझीलंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला होता. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही हातातोंडाशी आलेला विजयाचा घास ऑस्ट्रेलियानेच हिसकावून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर
VIDEO | लिविंगस्टोनने पाडला षटकारांचा पाऊस, ‘द हंड्रेड’मध्ये राशिद खानची धुलाई