पर्थच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (INDW vs AUSW) महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला (स्टंप्स) तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 105 धावा केल्या असून, संघाने आता पराभव पत्करला आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी अॅनाबेल सदरलँडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताच्या 198 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात 323 धावा केल्या.
यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने लवकरच 6 विकेट्स गमावल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhna) दुसऱ्या डावातही काही खास कामगिरी करू शकल्या नाहीत. या कसोटीत भारताला डावाचा पराभव टाळण्यासाठी अजूनही 20 धावा कराव्या लागणार आहेत. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 96/3 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर एलिस पेरी आणि अॅनाबेल सदरलँड यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि चौथ्या विकेटसाठी 128 धावांची शानदार भागीदारी करून ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यात परतवून आणले. पेरीने 76 धावा केल्या, तर सदरलँडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावत 129 धावांची मोठी खेळी खेळली.
मात्र, सदरलँड आणि पेरी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाने 240 धावांवर 5 वी विकेट गमावली होती, पण त्यानंतर 93 धावांच्या आतच संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 323 धावा केल्या. भारताकडून सायली सतघरेने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तिच्या व्यतिरिक्त क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर स्नेह राणा आणि शेफाली वर्मा यांनी 1-1 बळी मिळवला. दुसरीकडे, दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अतिशय वाईट झाली. पहिल्या दोन ओव्हर्समध्येच स्मृती मंधाना (2) आणि शेफाली वर्मा (5) स्वस्त्यात बाद झाल्या. त्यानंतर पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्जही (Jemimah Rodrigues) यावेळी काही विशेष करू शकली नाही आणि 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील फक्त 11 धावाच करू शकली. दीप्ती शर्मा (9) आणि रिचा घोष (0) यांनाही मोठी खेळी खेळता आली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून लुसी हॅमिल्टनने 3 विकेट्स आणि अॅनाबेल सदरलँडने 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 105/6 आहे. सध्या प्रतिका रावल आणि स्नेह राणा क्रीझवर टिकून आहेत. प्रतिका एक टोक सांभाळून खेळत असून ती 43 धावांवर नाबाद आहे. आता भारताला डावाचा पराभव टाळायचा असेल, तर तिसऱ्या दिवशी किमान 20 धावा आणखी कराव्या लागतील.






