यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राच्या (Neeraj chopra) सुवर्णपदकाची सर्व भारतीय आतुरतेनं वाट पाहत होते. नीरजला त्याच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकता आलं नाही. मात्र, सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमबाबत निरजच्या आईनं केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. दरम्यान, टोकियो 2020 कांस्यपदक विजेता बजरंग पुनियानं नीरजच्या आईच्या वक्तव्यावर एक भावनिक ट्विट केलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नीरजची आई सरोज देवी म्हणाल्या की, “आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी चांदीही सोन्याच्या बरोबरीची आहे. ज्यानं सुवर्ण जिंकले (अर्शद नदीम), तोही आमच्या मुलासारखा आहे. तो (नीरज) चोप्रा) जखमी झाला होता, त्यामुळे आम्ही त्याच्या कामगिरीवर खूश आहोत.”
नीरज चोप्राच्या आईचं वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक जण आपली मतं व्यक्त करत आहेत. या वक्तव्यावर बजरंग पुनियानं एक भावनिक ट्विटही केलं आहे. पुनियानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “आई ही आई असते. तिला नीरजच्या संघर्षाबद्दल आणि सीमेपलीकडे राहणारा नीरज चोप्राचा मित्र अर्शद नदीमबद्दलही माहिती आहे. दोघांची मैत्री आहे कारण ते देशाचे भाऊ आहेत. आपल्या सगळ्या माता अशाच असतात, पण आई ही आई असते.”
अर्शदनं भालाफेकमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला. त्यानं ऑलिम्पिक विक्रम केला. अर्शदनं 92.97 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्यानंतर 88.72 मीटर, 79.40 मीटर, 84.87 मीटर आणि शेवटी 91.79 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला आणि सुवर्णपदकावर त्याचं नाव कोरलं. नीरजबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं. नीरजचे 6 पैकी 5 प्रयत्न फाऊल होते. पण त्याचा एकच प्रयत्न कामी आला. नीरजनं 89.45 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं. तर कांस्यपदक पीटर्स अँडरसननं पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद कांबळीचा तो व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? जवळच्या मित्रानं दिलं प्रकृतीचं अपडेट
“माझं नाव हटवा, मला खूप काम आहेत” इंग्लंडचा प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक नाही ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? या दिवशी येणार कोर्टाचा निर्णय