---Advertisement---

विनोद कांबळीचा तो व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? जवळच्या मित्रानं दिलं प्रकृतीचं अपडेट

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, जो पाहून क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये कांबळी उभं राहण्यासाठी देखील धडपडत असल्याचं दिसत होतं. त्याला काही पावलं चालण्यासाठी तीन लोकांची मदत घ्यावी लागली होती.

आता विनोद कांबळीच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. कांबळीच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडिओ जुना आहे आणि सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. कांबळीचा शालेय वर्गमित्र रिकी आणि प्रथम श्रेणी पंच मार्कस यांनी गुरुवारी (8 ऑगस्ट) त्याची भेट घेतली.

दोघांनीही सांगितलं की, कांबळी ठीक आहे. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका. मार्कस म्हणाले, “आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो खूप आनंदी दिसत होता. त्याची प्रकृती सुधारत असून पूर्वीपेक्षा चांगली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. त्याच्या पोटावर चरबी नाही आणि तो आपले अन्न देखील चांगलं खातोय. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होतं.” विनोद कांबळीचा मुलगा क्रिस्टियानो देखील वडिलांप्रमाणे डावखुरा फलंदाज आहे. तो त्याच्या वडिलांकडून फलंदाजीच्या टिप्स घेत होता.

गुरुवारी दुपारी रिकी आणि मार्कस यांनी कांबळीसोबत सुमारे पाच तास घालवले. यादरम्यान कांबळीनं 90च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांचा आणि दिवंगत फिरकी जादूगार शेन वॉर्नचा सामना करण्याच्या आपल्या आठवणी सांगितल्या. कांबळीनं यावेळी जुनी हिंदी गाणीही गायली. 52 वर्षीय कांबळीला यापूर्वीही आरोग्याच्या समस्या होत्या. 2013 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला लीलावती रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.

 

विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करून खळबळ उडवली होती. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 129 सामन्यांमध्ये 59.67 च्या सरासरीनं 9965 धावा केल्या आहेत. विनोद कांबळीनं 1991 मध्ये भारताकडून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कांबळीनं आपल्या कारकिर्दीत 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2477 धावा केल्या. त्यानं 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्याच्या नावे 17 कसोटी सामन्यांमध्ये 1084 धावा आहेत.

हेही वाचा – 

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? या दिवशी येणार कोर्टाचा निर्णय
“तोही माझ्या मुलासारखाच आहे” पाकिस्तानच्या अर्शदच्या आईनं निरज चोप्राला दिला खास संदेश
सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---