पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्य फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने इटलीच्या सिमॉन बोलेल्ली व क्रोएशियाच्या इवान दोडीज यांचा सुपरटायब्रेकमध्ये 6-3, 3-6, 15-13 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
1 तास 33 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 4-3अशा फरकाने आघाडीवर असलेल्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांची आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांनी रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. उत्कंठावर्धक झालेल्या सुपरटायब्रेकमध्ये रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सुरेख खेळ केला. रोहन व दिवीज यांनी दोन मॅच पॉईंट्स वाचवले, तर पाचव्या मॅच पॉईंट्सवर 15-13 अशा फरकाने या जोडीने विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीने स्पेनच्या गेरार्ड ग्रनॉलर्स व मार्सेल ग्रनॉलर्स या जोडीचा 6-4, 3-6, 10-6असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 22 मिनिटे चालला. अंतिम फेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांचा सामना ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांच्याशी आज(दि.5 जानेवारी 2019 रोजी) दुपारी 3 वाजता होणार आहे.
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन) वि.वि.गेरार्ड ग्रनॉलर्स(स्पेन)/मार्सेल ग्रनॉलर्स(स्पेन) 6-4, 3-6, 10-6;
रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)(1)वि.वि. सिमॉन बोलेल्ली(इटली)/इवान दोडीज(क्रोएशिया) 6-3, 3-6, 15-13;