भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाला मागे टाकत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात उतरलेल्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले. फलंदाजी ,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत भारतीय संघ सर्वोत्तम जाणवला . या विजयानंतर संपूर्ण क्रीडा विश्वातून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, भारताचा विजय हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, ‘भारताचा हा विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील तसेच जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक मानला जाणार आहे ‘. रवी शास्त्री यांनी आपल्या पत्रकार परिषदेत कर्णधार अजिंक्य रहाणेचेही विशेष कौतुक केले आहे. अजिंक्यची खेळी ही सामन्याला कलाटणी देणारी ठरली, असे रवी शास्त्री यांनी सांगितले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात केवळ 36 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघांवर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती. अशातच नियमित कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतात परतले असल्याने भारतीय संघ 4 -0 ने मालिका गमावेल असे दिग्गज क्रिकेटर मत मांडत होते. मात्र अजिंक्यच्या भारतीय संघाने या सर्व शक्यतांना धुळीस मिळतात, जोरदार पुनरागमन करत सामना 8 विकेटने जिंकला. आपल्या नेतृत्वक्षमता व पहिल्या डावातील शतकी खेळीसाठी कर्णधार अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; इंग्लडचा संघ ‘हे’ पाऊल उचलण्याच्या तयारीत
रिकी पॉंटिंगचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घरचा आहेर, टीका करताना म्हणाला…