---Advertisement---

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या मानस धामणेचे आव्हान संपुष्टात

On: शुक्रवार, फेब्रुवारी 27, 2026 8:28 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पुणेकर मानस धामणे याला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविच याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या मानस धामणेचा 3-6, 7-6(8), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करत उपांत्य फेरी गाठली. हा सामना 2 तास 16 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. तिसऱ्या गेममध्ये दुजेने मानसची तर, पुढच्याच गेममध्ये मानसने दुजेची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. सहाव्या गेममध्ये मानसने जोरदार परतीचे फटके मारत दुजेची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील मानसने सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये दुजेची सर्व्हिस रोखली व 2-1 अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या दुजेने जोरदार कमबॅक करत आठव्या गेममध्ये मानसची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. अखेर पर्यंत बरोबरी कायम राहिल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये दुजेने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत हा सेट 7-6(8) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दुजेने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत पहिल्याच गेममध्ये मानसची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखली. त्यानंतर चौथ्या गेममध्ये मानसने दुजेची सर्व्हिस रोखली व सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. दुजेने बिनतोड सर्व्हिसचा व आक्रमक खेळाचा मारा करत मानसची पुन्हा सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला.

ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिल याने पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्कीचा 0-6, 7-6(2), 6-1 असा कडवा प्रतिकार करत आगेकूच केली. फेलिक्सने मॅक्सचे आव्हान 2तास 5 मिनिटात मोडीत काढले. अवघ्या 28 मिनिटात पहिला सेट मॅक्सने फेलिक्स विरुद्ध 6-0 असा एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फेलिक्सने मॅक्सची नवव्या गेममध्ये सर्व्हिसची रोखली. पण पुढच्याच गेममध्ये मॅक्सने फेलिक्सची सर्व्हिस ब्रेक केली व 5-5 अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत बरोबरी कायम राहिल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये फेलिक्सने जोरदार खेळ करत हा सेट 7-6(2) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये फेलिक्सने दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये मॅक्सची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकला. आठव्या मानांकीत लिथुनियाच्या एडास बुटविलास याने जपानच्या क्वालिफायर मासामिची इमामुराचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. इटलीच्या सहाव्या मानांकित फेडेरिको सिना याने ग्रेट ब्रिटनच्या ॲलिस्टर ग्रेचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

दुहेरीत दुसऱ्या मानांकित भारताच्या निकी कालियांदा पूनाचाने थायलंडच्या प्रुच्या इसारो यांनी जपानच्या तिसऱ्या मानांकित युता शिमिझू व सीता वातनाबे यांचा 7-5, 7-6(4) असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: एकेरी:
एडास बुटविलास 8वि.वि.मासामिची इमामुरा(जपान) 6-3, 6-3;
फेलिक्स गिल(ग्रेट ब्रिटन)वि.वि.मॅक्स कास्निकोव्स्की (पोलंड)0-6, 7-6(2), 6-1;
फेडेरिको सिना 6 वि.वि.ॲलिस्टर ग्रे (ग्रेट ब्रिटन)6-4, 6-2;
दुजे अजदुकोविच(क्रोएशिया)वि.वि.मानस धामणे(भारत)3-6, 7-6(8), 6-4;

दुहेरी: उपांत्य फेरी:
प्रुच्या इसारो(थायलंड)/निकी कालियांदा पूनाचा(भारत)[2] वि.वि.युता शिमिझू(जपान)/ सीता वातनाबे 37-5, 7-6(4);

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---