न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. नुकताच या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूर येथे पार पडला. या सामन्यासह भारतीय संघाने त्यांच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२२ मोहिमेचीही सुरुवात केली आहे. परंतु भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपदातील आपला हा पहिलावहिला सामना जिंकण्यात यश आले नाही. चिवट झुंजीनंतर केवळ एका विकेटमुळे त्यांचा विजय हुकला आणि हा सामना अनिर्णीत राहिला.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून या डावात पदार्पणवीर श्रेयस अय्यरने १०५ धावांची मोठी खेळी केली होती. तसेच सलामीवीर शुबमन गिल आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतक झळकावली होती. या डावाता न्यूझीलंडकडून टीम साउदीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताच्या या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९६ धावांवरच गारद होता. न्यूझीलंडकडून केवळ त्यांचे सलामीवीर टॉम लॅथम (९५ धावा) आणि विल यंग (८९ धावा) अर्धशतके करू शकले होते. भारताकडून या डावात अक्षर पटेलने विकेट्सचा पंचक घेतला होता. अशाप्रकारे भारताने पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली होती.
या ४९ धावांच्या आघाडीमध्ये २३४ धावांची भर घालत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पाचव्या दिवसाखेर १६५ धावाच करू शकला. परंतु पाचव्या दिवसाअंती त्यांचा दहावा खेळाडू नाबाद राहिल्याने सामना अनिर्णीत राहिला.
पुन्हा भारताला नडला न्यूझीलंडचा संघ
अशाप्रकारे न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे (विजयासह) कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात करू शकला नाही. दुर्देवाची बाब म्हणजे, न्यूझीलंडपुढे भारताने विजयापासून वंचित राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १५ वर्षांपासून भारतासाठी आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघ मोठा अडथळा ठरत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन आयसीसी स्पर्धांचा विचार केल्यास भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाची मोठी किंमत मोजावी लागली आहे.
यामध्ये टी२० विश्वचषक २०२१, २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना आणि २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामना यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, भारतीय संघ २००३ नंतर आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवूच शकलेला नाही. २००३ नंतर भारताला २००७ साली टी२० विश्वचषकात, २०१६ साली टी२० विश्वचषकात, २०१९ वनडे विश्वचषकात, २०१९-२१ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी फेरीत (२ कसोटी सामन्यांच्या मालिकेत), पुढे अंतिम सामन्यात, टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरी सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आणि आता २०२१ च्या कसोटी अजिंक्यपदाच्या पहिल्याच सामन्यात देखील भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
म्हणजेच भारतीय संघ २००३ नंतर आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ७ सामन्यांत पराभूत झाला आहे आणि एका सामन्यात विजयाच्या नजीक पोहोचूनही सामना जिंकण्यात अपयश (सामना अनिर्णीत राहिला) आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच शिखर धवन भारतीय जर्सीतून दिसला सुटाबुटात, व्हिडिओ व्हायरल
विराट-एबीनंतर कोण असेल आरसीबीचा नवा कर्णधार ? धोनीच्या जुन्या सहकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर
रहाणेवर टीका अशीच होत नाही, गेल्या २० डावांतील कामगिरी तुम्हाला माहित आहे का?