भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा टी२० सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. मालिकेत १-२ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होतं. भारताने हे आव्हान स्विकारत लौकिकाला साजेसा खेळ करत या सामन्यात इंग्लंडला मात देऊन मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
आता या मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना २० मार्च (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे. चौथ्या सामन्यात भारताने संघात दोन बदल केले होते. त्यामुळे निर्णायक सामन्यात भारतीय संघ काय बदल करणार, याची सगळ्यांना उत्सुकता असेल. या लेखात आपण भारताच्या संभावित प्लेइंग इलेव्हनचा आढावा घेऊया –
फलंदाजी फळीत बदल होण्याची शक्यता कमी –
भारतीय संघाने चौथ्या सामन्यात ईशान किशनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली होती. त्याने या संधीचे सोने करत तडाखेबंद अर्धशतक झळकवले होते. त्यामुळे संघात त्याला कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त केएल राहुल फारसा फॉर्मात नसला तरी रोहित शर्मा आणि राहुल हीच जोडी सलामीसाठी कायम ठेवली जाईल. तर मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक रिषभ पंत फलंदाजीची धुरा वाहतील.
अष्टपैलू खेळाडू –
भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडूंच्या जागी हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आत्तापर्यंत मालिकेत संधी दिली आहे. यापैकी हार्दिकला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नसली तरी देखील त्याने गोलंदाजीत आपली भूमिका चोख बजावली आहे. वॉशिंग्टन सुंदरने देखील गोलंदाजीत मोक्याच्या क्षणी बळी मिळवले आहेत. मात्र चौथ्या सामन्यात सुंदरला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू राहुल तेवतियाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीत एक बदल अपेक्षित –
या मालिकेत भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र पाचव्या सामन्यासाठी संघात टी नटराजनचे पुनरागमन झाले आहे. अशा परिस्थितीत डावखुरा गोलंदाजाचा समावेश करून वैविध्य आणायचे झाल्यास शार्दूल किंवा भुवनेश्वरला वगळले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
झिंगाटच! मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ साठी करतोय जोरदार तयारी, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ : या खास कारणासाठी ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींचे आभार






