विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. अंतिम सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ खूप मेहनत घेत आहेत. पण या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला अंतिम संघाच्या निवडीची समस्या सतावते आहे.. भारतीय संघाचा फलंदाजी क्रम जवळपास निश्चित झाला आहे. परंतु, गोलंदाजी आक्रमणात अद्यापही कोणाला खेळवायचे आणि कोणाला नाही या गोष्टीवर विचार सुरूच आहे. याच निमित्ताने या लेखात भारताच्या संभाव्य अंतिम संघावर नजर टाकूया.
अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची घोषणा झाल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की, रोहित शर्मासह शुबमन गिल सलामीला उतरेल. इंग्लिश वातावरणात दोन्ही सलामी फलंदाजांना नवीन चेंडूचा सामना हुशारीने करावा लागेल. तिसऱ्या क्रमाकांवर भारताच्या फलंदाजी फळीचा आधारस्तंभ असलेला चेतेश्वर पुजारा फलंदाजी करेल. पुजाराकडे इंग्लंडमधील खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे.
भारतीय संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर असेल. चौथ्या क्रमाकांवर कोहली असेल आणि पाचव्या क्रमाकांवर रहाणे फलंदाजी करेल. मागील इंग्लंड दौऱ्यात कोहलीने दमदार प्रदर्शन केले होते. तसेच अजिंक्य रहाणे देखील गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघासाठी रिषभ पंत यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल आणि तो सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करेल. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे या संघात अष्टपैलूंची भूमिका बजावतील. ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
गोलंदाजांकडे पाहिल्यास भारतीय संघाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. दरम्यान जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या दोघांचे खेळणे निश्चित आहे. मात्र इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकालाच संधी मिळेल. संघ व्यवस्थापन मोहम्मद सिराजला त्याचा फॉर्म पाहून अंतिम संघात स्थान देऊ शकते. मात्र इशांत शर्माचा अनुभव पाहता त्याला संधी दिल्यास आश्चर्य वाटायला नको.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज/इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा क्रिकेटपटू बुमराहची बायकोच आली त्याची मुलाखत घ्यायला, पुढे झाले असे काही की
–जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास
–कारकिर्दीदरम्यान होणाऱ्या टीकांना कसा सामोरा जातोस? अजिंक्य रहाणेने दिले मन जिंकणारे उत्तर