टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) ची सुरुवात 07 फेब्रुवारीपासून झाली आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान सरकारने जाहीर केले होते की, त्यांचा संघ टी20 विश्वचषक खेळेल, परंतु 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही. मात्र, आता सामन्याची वेळ जवळ येत असताना पाकिस्तानचा हा ‘बहिष्कार’ कमकुवत होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, रविवारी (08 फेब्रुवारी) सकाळी समोर आलेल्या बातम्यांनुसार, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या भूमिकेत थोडी शिथिलता आणली आहे. म्हणजेच पाकिस्तान आता आपला निर्णय बदलण्याचा विचार करू लागला आहे. पण आता समोर आलेल्या नवीन रिपोर्ट्सवरून असे समजते की, पाकिस्तान आपला निर्णय जवळपास बदलूच शकतो.
खरे तर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, ICC ने पाकिस्तानला भारताविरुद्ध सामना न खेळल्यास होणाऱ्या आर्थिक आणि इतर नुकसानीची जाणीव करून दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पैशांचे नुकसान होईल हे ऐकल्यानंतर पाकिस्तानने आपला विचार बदलण्याचे पाऊल उचलले आहे.
आता समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, भारताविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराबाबत पाकिस्तानकडून लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, या संदर्भात आतापर्यंत कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत नेमकी अधिकृत माहिती कधी समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा सर्वात मोठा आणि अटीतटीचा मानला जातो, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. चाहते अतिशय उत्साहाने या दोन देशांमधील लढत पाहत असतात. आता यावेळी चाहत्यांना भारत-पाकिस्तान आमनेसामने पाहायला मिळतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






