गोल्ड कोस्ट | आज सकाळच्या सत्रात भारताचे पदक पक्के करणाऱ्या राहूल आवारेने जबरदस्त कामगिरी करताना पदक पक्के केले होते तर दुपारच्या सत्रात या पदकाचा त्याने रंग बदलला आहे. त्याने कुस्तीत ५७ किलो वजनी गटात ही सुवर्णमय कामगिरी केली आहे.
आपली पहिलीच राष्ट्रकूल स्पर्धा खेळणाऱ्या राहूलने चमकदार कामगिरी करताना सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा मल्ल मुहम्मद बिलालचा १०-८ असा पराभव केला तर अंतिम फेरीत त्याने कॅनडाच्या स्टीवन तश्काहासीनर १५-७ असा विजय मिळवला. भारताचे हे १३ वे सुवर्णपदक असून राहूलचे हे पहिलेच राष्ट्रकूल पदक आहे.
२६ वर्षीय राहूलने या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया, कॅनडा, पाकिस्तान आणि इंग्लंडच्या मल्लांवर विजय मिळवला आहे.