fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन, अर्जुन कढे यांचे आव्हान संपुष्टात

पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए)च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसोने भारताच्या रामकुमार रामनाथनचा तर झेकियाच्या जिरी वेस्लीने अर्जुन कढेचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 2 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 182 असलोल्या भारताच्या 25 वर्षीय रामकुमार रामनाथनचा जागतिक क्रमांक 98 असलेल्या 27 वर्षीय इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसोने 3-6,6-4,7-5 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. रामनाथनने पहिला सेट 3-6 असा जिंकल्यानंतर साल्वाटोर कारुसोने पुर्ण क्षमतेनिशी खेळत दुसरा व तीसरा सेट अनुक्रमे 6-4,7-5 असे जिंकत सामन्यात विजय मिळवला.

1 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जेम्स डकवर्थने जर्मनीच्या पीटर गोजोझिकचा 7-6(5), 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमांक 96 असलेल्या 28 वर्षीय जेम्सने पहिल्या सेटमध्ये सावकाश सुरूवात केली. बाराव्या गेमपर्यंत सामना 6-6 असा बरोबरीत राहिल्याने सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्येही जागतिक क्रमांक 106 असलेल्या 30 वर्षीय पीटरने चांगली झुंज दिली. मात्र जेम्सने 7-6(5) असा सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये चौथ्या गेमपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत असताना पाचव्या गेममध्ये जेम्सने पीटरची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. सहाव्या आठव्या व दहाव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत 6-4 असा सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला.

पुण्याचा वाईल्ड कार्ड प्राप्त 26 वर्षाय जागतिक क्रमांक 612 असलेला अर्जुन कढेचा झेकियाच्या 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या जिरी वेस्लीने 6-2,6-4 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत अर्जुनवर दबाव निर्माण केला. चौथ्या गेमपर्यंत जिरीने 3-1 अशी आघाडी घेत पाचव्या गेममध्ये पुन्हा अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली. सहाव्या व आठव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत जिरीने पहिला सेट 6-2 असा खिशात घतला. दुस-या सेटमध्येही पहिल्याच गेममध्ये जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढे दहाव्या गेमपर्यंत जिरीने स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा सेट 6-4 असा जिंकत. सामना 6-2,6-4 असा जिंकून दुस-या फेरीत प्रवेश केला.

आठव्या मानांकीत बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याने इटलीच्या पाओलो लोरेन्झी याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर इटलीच्या रॉबर्टो मार्कोराने झेकियाच्या लुकास रोझोल याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- पहिली फेरी

साल्वाटोर कारुसो (इटली)(7)वि.वि रामकुमार रामनाथन(भारत) 3-6,6-4,7-5
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि अर्जुन कढे (भारत) 6-2, 6-4
जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया)(6)वि.वि पीटर गोजोझिक (जर्मनी) 7-6(5), 6-4
एगोर गेरासीमोव्ह (बेलारूस)(8) वि.वि पाओलो लोरेन्झी (इटली) 6-2, 6-3
रॉबर्टो मार्कोरा (इटली) वि.वि लुकास रोझोल (झेकिया) 6-3, 6-2

You might also like