मुंबई ६ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, ऋतुजा भोसले यांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरे हिने देखील विजयी सलामी दिली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत काल अव्वल मानांकित खेळाडूवर सहजा यमलापल्लीने सनसनाटी विजय मिळवला होता. आज, वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने दुसऱ्या मानांकित खेळाडूचा पराभव करून आजचा दिवस गाजवला. जागतिक क्रमवारीत ५२०व्या स्थानी असलेल्या २२व्या श्रीवल्ली हिने जपानच्या दुसऱ्या मानांकित नाओ हिबिनोचा टायब्रेकमध्ये २-६, ६-१, ७-६(५) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना २ तास १७मिनिटे चालला. उप-उपांत्यपूर्व फेरीत श्रीवल्ली समोर १६ वर्षीय अलिना कॉर्निव्हाचे आव्हान असणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र दुहेरीतील सुवर्णपदक विजेती खेळाडू भारताच्या ऋतुजा भोसले हिने थायलंडच्या पेंगतारण प्लीपुचचा ६-४, ७-५ असा पराभव करून आगेकूच केली. हंगेरीच्या दालमा गल्फी हिने सातव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या किंबर्ली बायरेईलचा ६-२, ४-६, ७-५ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. मागील आठवड्यात एनइसीसी आयटीएफ ५००००डॉलर स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या जपानच्या मोयुका उचीजिमा हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत फ्रान्सच्या कॅरोल मोनेटचे आव्हान ६-३, ६-३ असे संपुष्टात आणले.
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरेने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत थायलंडच्या लुकसिका कुमखुम व पेंगतारण प्लीपुच या चौथ्या मानांकित जोडीचा ६-४, २-६, १०-६ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
निकाल: एकेरी: पहिली फेरी:
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती(भारत)वि.वि. नाओ हिबिनो(जपान)२-६, ६-१, ७-६(५);
पोलीना कुडेरमेतोव्हा(रशिया)वि.वि.एनास्तेसीया झाकरोवा(रशिया)७-६(८), ६-०;
एरिना रोडीनोव्हा(ऑस्ट्रेलिया)(४)वि.वि.सुझेन लामेन्स(नेदरलँड)६-२, ७-५;
अमनदिनी हासे (फ्रांस)वि.वि.लीना ग्लूशको(इस्त्राईल)६-१, ६-१;
मोयुका उचीजिमा(जपान)वि.वि.कॅरोल मोनेट(फ्रांस) ६-३, ६-३;
ऋतुजा भोसले(भारत)वि.वि.पेंगतारण प्लीपुच (थायलंड) ६-४, ७-५;
कॅमिला रोसटेलो(इटली)वि.वि.एनास्तेसीया तिखोनोव्हा(रशिया)७-५, ३-६, ६-२;
स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)वि.वि.फॅनी स्टोलर(हंगेरी)३-० सामना सोडून दिला;
दालमा गल्फी(हंगेरी)वि.वि. किंबर्ली बायरेईल(ऑस्ट्रेलिया)(७)६-२, ४-६, ७-५;
दुहेरी: पहिली फेरी:
अरियानी हॉर्तोनो(नेदरलँड)/प्रार्थना ठोंबरे(भारत)वि.वि.लुकसिका कुमखुम(थायलंड)/पेंगतारण प्लीपुच (थायलंड)(४)६-४, २-६, १०-६;
कॅरोल मोनेट(फ्रांस)/एकतेरिना याशीना(रशिया)वि.वि.व्हॅलेंटिनी ग्रामटीकोपोलु(ग्रीस)/दरजा सेमेनिस्तजा(लात्विया)७-६(७), ६-४.
महत्वाच्या बातम्या –
पंतच्या फिटनेसबाबत सर्वात मोठी अपडेट! पाँटिंग म्हणतोय, ‘तो आयपीएल खेळेल, पण…’
जगातील नाही, फक्त भारतातील बेस्ट बॅटर? विराटविषयी काय बोलून गेला मोहम्मद शमी