भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या काउंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. चहल काउंटी क्रिकेटमध्ये नाॅर्थेम्प्टशायर संघासाठी खेळत आहे. त्यानं संघासाठी पदार्पण सामन्यातच चमकदार कामगिरी केली. चहलनं पदार्पण सामन्यातच धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत 5 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आणि विरोधी संघाला चांगलाच झटका दिला.
इंग्लंडच्या देशांतर्गत एकदिवसीय चषकामध्ये ग्रुप-ए चा सामना कँट आणि नाॅर्थेम्प्टशायर या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताच्या 2 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताचा स्टार फिरकीपटू चहलने त्याचा पदार्पण सामना खेळला, तर पृथ्वी शाॅ आधीपासूनच खेळत आहे. तत्पूर्वी कँटचा कर्णधार जॅक लीनिंगनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चहलनं हा निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक बनवला. त्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली.
कँट संघाचे 2 महत्वपूर्ण खेळाडू केवळ 6 धावांवरतीच तंबूत परतले. सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकले नाहीत. त्यानंतर कर्णधार आणि यष्टीरक्षकसुद्धा धावा करण्यात अयशस्वी राहिले, तर मधल्या फळीतील फलंदाज जेडन डेनलीनं 22 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर संघ पुन्हा अडचणीत पडला. केवळ 82 धावांवरती संघ सर्वाबाद झाला.
चहलनं या सामन्यात चमकदार गोलंदाजी केली. त्यानं त्याच्या 10 षटकात 5 षटक निर्धाव टाकले, तर केवळ 14 धावा देऊन 5 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. विरोधी संघाचा कोणताच फलंदाज या फिरकीपटूला सहज खेळू शकला नाही. त्यानंतर जस्टिन ब्राॅडनं 16 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. परंतु पृथ्वी शाॅ या सामन्यात चागंली कामगिरी करु शकला नाही. त्यानं 20 चेंडूत केवळ 17 धावा केल्या आणि तंबूत परतला.
युझवेंद्र चहलच्या (Yuxvendra Chahal) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 72 एकदिवसीय आणि 80 टी20 सामने खेळले आहेत. 72 एकदिवसीय सामन्यात त्यानं 121 विकेट्स घेतल्या आहेत, तर 80 टी20 सामन्यात 96 विकेट्स घेतल्या आहेत. चहलनं भारतासाठी एकही कसोटी सामना खेळला नाही. 2024च्या झालेल्या टी20 विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!
दुलीप ट्राॅफीसाठी 4 संघ जाहीर…! पंत-सूर्या नाही, तर ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाले कर्णधारपद
विनेश फोगट भारतात कधी परतणार? मेडल सोबत असेल की नाही? सर्वकाही जाणून घ्या