नवी दिल्ली: भारताच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी बहरीन ज्युनियर व कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये आणखीन आठ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. बहरीनच्या मनामा येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या पायस जैनने मुलांच्या कॅडेट वैयक्तिक गटात अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या सिमोन बेलिकला नमवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
मुलींच्या कॅडेट गटात पाच युवा भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी उपांत्यपुर्व फेरीत स्थान मिळवले होते त्यापैकी अवघ्या दोन जणांनाच उपांत्यफेरीपर्यंत पोहोचता आले. अनारग्या मंजुनाथ व यशस्विनी घोरपडे यांनी अनुक्रमे ग्रीसच्या मालामाटेनिआ पापादीमित्रिओ व इजिप्तच्या हॅना गोडाला नमवित अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात कर्नाटकच्या अनारग्याने यशस्विनीला 3-1 अशा फरकाने नमवित सुवर्णपदक पटकावले.
सुहाना सैनी व स्वस्तिका घोष यांनी अनुक्रमे मिनी कॅडेट मुली व ज्युनियर मुलींच्या गटात सहभाग नोंदवला होता व त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली. सुहानाला (15 वर्षाखालील) जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेल्या इजिप्तच्या हॅना गोडाने उपांत्यफेरीत नमविले.तर, स्वस्तिकाला रशियाच्या क्रिस्टिना
कझानत्सेवाने पराभूत केले.
दुहेरीमध्ये अनारग्या मंजुनाथ व सुहाना सैनी आणि मनुश्री पाटील व स्वस्तिका घोष जोडींनी मुलींच्या ज्युनियर गटाच्या उपांत्यफेरीत धडक मारली. पण, रशियाच्या क्रिस्टिना कझानत्सेवा व ओल्गा विशनिआकोवा जोडीने चमक दाखवली. स्वस्तिका व मनुश्री जोडीने जोरदार सुरुवात केली पण, रशियाच्या या जोडीने पुनरागमन करत सामना 3-2 असा जिंकला. त्यामुळे भारतीय जोडीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
मुलांच्या ज्युनियर दुहेरीत पायस जैन व दिपीत पाटील यांना रशियाच्या आर्टेम टिकोनोव व लेव कॅट्समन जोडीकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापुर्वी भारतीय चमूने चार पदकांची कमाई केली होती व या आठ पदकांसह भारताने या स्पर्धेत एकूण 12 पदकांची कमाई करत चमक दाखवली.