भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटीतील पहिला सामना ऍडलेड येथे खेळवला जात आहे. आज या सामन्यातील तिसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ ढेपाळताना दिसला. दुसऱ्या डावात संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यादरम्यान फलंदाज मोहम्मद शमी धाव करून दुखापतग्रस्त झाल्याने भारताने आपला डाव ३६ धावांवरच घोषित केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान पूर्ण करत यजमान संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाकडून बर्न्सने झळकावले अर्धशतक
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी सलामीला फलंदाजी केली. यादरम्यान १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेड यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून धावबाद झाला. त्याने ३३ धावा केल्या. त्यानंतर मार्नस लॅब्यूशाने फलंदाजीला आला. लॅब्यूशानेही खास कामगिरी करता आली नाही. तो २० वे षटक टाकत असलेल्या अश्विनच्या सहाव्या चेंडूवर अगरवालच्या हातून झेलबाद झाला. यावेळी त्याने ६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने बर्न्सने डाव सावरला. त्याने यावेळी ६३ चेंडूचा सामना करताना ५१ धावा करत अर्धशतक झळकावले. यामध्ये १ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
अशा गमावल्या भारताने आपल्या ९ विकेट्स
दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसरा डाव सुरू झाल्यानंतर सलामीला पृथ्वी शॉ आणि मंयक अगरवाल आले होते. यावेळी शॉने आपली विकेट गमावली होती त्यामुळे बुमराह फलंदाजीस आला. यानंतर तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना बुमराह केवळ २ धावा करत ८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कमिन्सच्या हातून झेलबाद झाला.
यानंतर संघाचा डाव १५ धावांवरच असताना पुजाराही कमिन्स टाकत असलेल्या १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक टीम पेनच्या हातून झेलबाद झाला. कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा पुजारा शून्यावरच तंबूत परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली (४), अजिंक्य रहाणे (०), हनुमा विहारी (८), वृद्धिमान साहा (४) आणि आर अश्विन (०) धावेवर हे बाद झाले. हे सर्व खेळाडू झेलबाद झाले.
यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पॅट कमिन्सनेही ४ विकेट्सची कमाई केली.
असा होता भारताचा पहिला डाव
यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात संघाने सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या महत्त्वपूर्ण ७४ धावांचा समावेश आहेत. सोबतच चेतेश्वर पुजारा (४३) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (४२) धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नव्हता.
याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्यासोबतच उमेश यादवने ३, तर जसप्रीत बुमराहने २ विकेट्सची कमाई केली होती.
ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता.