सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पुणे येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तर, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली आहे. रविवारी(२८ मार्च) होणाऱ्या अखेरच्या सामन्याला अंतिम फेरीचे रूप आले असताना, या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आपल्या संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊया, अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल.
१) रोहित शर्मा
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा अखेरच्या सामन्यात सलामीला येईल. पहिल्या दोन सामन्यात मिळून त्याने केवळ ५३ धावा केल्या आहेत. निर्णायक सामन्यात तो मोठी खेळी करण्यास आतुर असेल.
२) शिखर धवन
तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मासोबत शिखर धवन सलामीला येणे निश्चित आहे. धवनने मालिकेतील पहिल्या सामन्यात ९८ धावा बनविल्या होत्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो केवळ चार धावा बनवू शकला. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला त्याच्याकडून चांगल्या सलामीची अपेक्षा असेल.
३) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसर्या स्थानावर खेळेल. विराटने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकली आहेत. मागील ४९० दिवसांपासून असलेला आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ तो या सामन्यात संपवू शकतो.
४) केएल राहुल
टी२० मालिकेत अपयशी ठरल्यानंतर राहुलने वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्याने शतक ठोकले. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित पुन्हा एकदा त्याच्यावर मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी असेल.
५) रिषभ पंत
जवळपास दीड वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या पंतने दुसऱ्या वनडेत ७७ धावांची तुफानी खेळी केली. त्याला आपला हा जबरदस्त फॉर्म कायम राखत पुन्हा एकदा भारताला मालिका विजय साजरा करण्यासाठी मदत करावी लागेल.
६) हार्दिक पंड्या
सध्या भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू असलेला हार्दिक पंड्या अखेरच्या वनडे सामन्यात भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सहाव्या क्रमांकावर येऊन दुसऱ्या सामन्याप्रमाणेच मोठी फटकेबाजी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. त्याने दुसऱ्या सामन्यात १६ चेंडूंमध्ये ३६ धावा ठोकल्या होत्या.
७) कृणाल पंड्या
हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणालने मालिकेतील पहिल्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने विक्रमी अर्धशतक झळकावले. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाजी करताना अत्यंत महागडा ठरला.तिसऱ्या सामन्यात संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल.
८) भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार करत आहे. टी२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही त्याने प्रभावी गोलंदाजी केली. निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघ त्याच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीची अपेक्षा करत आहे.
९) टी नटराजन
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन कसोटी मालिकेला मुकला होता. टी२० मालिकेतही तो केवळ एक सामना खेळलेला. अखेरच्या निर्णायक वनडेमध्ये कर्णधार व संघ व्यवस्थापन शार्दुल ठाकूरच्या ऐवजी त्याला संधी देऊ शकते.
१०) प्रसिद्ध कृष्णा
मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय सामनातून पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. पहिल्या सामन्यात चार तर, दुसऱ्या सामन्यात दोन बळी मिळवत तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याच्याकडून संघाला आणखी चांगल्या कामगिरीची आशा असेल.
११) युजवेंद्र चहल
टी२० मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर लेगस्पिनर युजवेंद्र चहलला वनडे मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. मात्र, त्याच्या जागी संधी दिल्या गेलेल्या कुलदीप यादवने सर्वांना निराश केले. अशा परिस्थितीत अखेरच्या निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहली चहलला पाचारण करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा भारतीय संघात नाही दिसणार ‘हा’ फिरकीपटू, पुण्यात खेळला आपला अखेरचा सामना?
Video: मुंबई इंडियन्स फॅन्स, तुमच्या आवडत्या संघाची नवी जर्सी पाहिली का?
विराटने ४ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ