अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० विकेट्सने जिंकला आहे. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारताला ४९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही विकेट न गमावता ४९ धावांचे आव्हान पूर्ण केले. रोहितने नाबाद २५ धावा आणि शुबमनने नाबाद १५ धावा केल्या.
इंग्लंडचा डाव ८१ धावांवर संपुष्टात
या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०.४ षटकांत ८१ धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर आता हा सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याच्याशिवाय जो रुट(१९) आणि ऑली पोप (१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली.
अक्षरचे विकेट्स पंचक
भारताला १४५ धावांवर सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. मात्र इंग्लंडच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रावलीला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो डीआरएस रिव्ह्यूमुळे बाद होता होता वाचला. पण पुढच्याच चेंडूवर अक्षरने त्याला त्रिफळाचीत करत बद केलेच. त्यामुळे इंग्लंडची अवस्था पहिल्या ३ चेंडूतच २ बाद ० धावा अशी झाली.
पुढे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डॉमनिक सिब्लीसह डाव सांभाळला होता. पण अक्षरनेच ९ व्या षटकात सिब्लीला ७ धावांवर बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. यानंतर रुटने बेन स्टोक्सला साथीला घेत इंग्लंडच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या ५० पर्यंत पोहचवली. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच डावाच्या १८ व्या षटकात आर अश्विनने २५ धावांवर खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पायचीत केले. पुढे १९ व्या षटकात अक्षरने जो रुटला बाद करत भारताच्या मार्गातील मोठा काटा दूर केला. रुट १९ धावांवर यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला.
पुढे आर अश्विनेन ऑली पोपला १२ धावांवर आणि जोफ्रा आर्चरला शुन्यावर बाद केले. तर बेन फोक्सचा अडथळा अक्षरने दूर करत या डावातील ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. जॅक लीचला अश्विनने बाद करत इंग्लंडला ९ वा धक्का दिला. तर अखेर वॉशिंग्टन सुंदरने जेम्स अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव ८१ धावांवर संपुष्टात आणला.
भारताला ३३ धावांची आघाडी
भारताचा पहिला डाव ५३.२ षटकांत १४५ धावांवर संपुष्टात आला आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर संपुष्टात आला असल्याने भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली आहे.
भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मालाच अर्धशतकी खेळी करता आली. त्याने ६६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय केवळ विराट कोहलीने २० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने २७ धावा केल्या. अन्य कोणच्याही फलंदाजाला फार काही खास करता आले नाही. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर जॅक लीचने ४ आणि जोफ्रा आर्चरने १ विकेट्स घेतल्या.
भारतीय फलंदाजी ढेपाळली
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ३४ व्या षटकापासून ३ बाद ९९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून पहिल्या दिवशी नाबाद असलेले रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी उतरले. मात्र सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे डावाच्या ३९ व्या षटकात जॅक लीचच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. रहाणेने ७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीला आला.
पण, त्यानंतर ४१ व्या षटकात जॅक लीचने अर्धशतकवीर रोहित शर्माचा मोठा अडथळा इंग्लंडच्या मार्गातून दूर केला. लीचने त्याला पायचीत केले. रोहितने रिव्ह्यू घेतला होता. मात्र, त्यात ‘अंपायर्स कॉल’ निकाल आल्याने रोहितला माघारी परतावे लागले. रोहितने ९६ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार मारले.
रोहित बाद झाल्यानंतर पुढचे षटक इंग्लंडचा कर्णधार जो रुटने टाकले. विशेष म्हणजे त्याला पहिल्याच चेंडूवर रिषभ पंतची विकेट मिळाली. रुटने टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातात गेला. त्यामुळे पंत १ धाव करुन बाद झाला.
रुटने त्यापुढे ४६ व्या षटकात भारताला दुहेरी धक्का दिला. या षटकात त्याने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला प्रत्येकी शुन्य धावेवर बाद केले. रुटचा कहर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने ५० व्या षटकात आर अश्विनलाही १७ धावांवर माघारी धाडले. भारताच्या डावाची अखेरची विकेटही जो रुटने जसप्रीत बुमराहला १ धावेवर बाद करत भारताचा पहिला डाव १४५ धावांवर संपुष्टात आणला.