---Advertisement---

INDvsAFG: मानव सुथारने पदार्पणाच्या कसोटीत रचले अनेक विक्रम! 6 विकेट्स घेत आर अश्विनच्या स्पेशल यादीत केली एंट्री

On: सोमवार, जून 8, 2026 12:13 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामना मुल्लानपूरमध्ये खेळला जात (6 जूनपासून) आहे. हा सामना फिरकीपटू मानव सुथारच्या पदार्पणामुळे लक्षात राहिल. या युवा गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. याचबरोबर त्याने दिग्गज आर अश्विनच्या एका खास यादीत स्थान मिळवले आहे.

मानवसमोर अफगाणि फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकलेच नाही. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 564 धावसंख्येचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताला 412 धावांची मोठी आघाडी मिळाली, ज्यामुळे यजमानांनी अफगाणिस्तानवर फॉलो-ऑन लादला.

या सामन्यात मानवने त्याच्या पहिल्या षटकापासूनच उल्लेखनीय कामगिरीची सुरूवात केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (रविवार, 7 जून) पहिले षटक टाकले असता चौथ्याच चेंडूवर विकेट घेतली. आता तिसऱ्या दिवशीही त्याने विकेट्सचा सपाटा लावला आणि अनेक विक्रमांच्या यादीत प्रवेश केला. गेल्या 35 वर्षांत भारतासाठी कसोटी पदार्पण करताना एका डावात सहा विकेट्स घेणारा मानव दुसराच गोलंदाज ठरला. त्याच्याआधी अशी कामगिरी आर अश्विनने केली होती. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना 47 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

त्याचबरोबर मानव भारतासाठी कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा दहावा खेळाडू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी शेवटी 2021 मध्ये अक्षर पटेलने केली होती.

भारतासाठी कसोटी पदार्पण करताना सामन्याच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी करणारे
1932 – मोहम्मद निसार विरुद्ध इंग्लंड
1961 – वामन कुमार विरुद्ध पाकिस्तान
1967 – एस आबिद अली विरुद्ध ऑस्ट्रेलिया
1979 – दिलीप दोशी विरुद्ध ऑस्ट्रेलिया
1988 – नरेंद्र हिरवाणी विरुद्ध वेस्ट इंडिज
2008 – अमित मिश्रा विरुद्ध ऑस्ट्रेलिया
2011 – आर अश्विन विरुद्ध वेस्ट इंडिज
2013 – मोहम्मद शमी विरुद्ध वेस्ट इंडिज
2021 – अक्षर पटेल विरुद्ध इंग्लंड
2026 – मानव सुथार विरुद्ध अफगाणिस्तान*

मानवचे पदार्पण भारताच्या कसोटी इतिहासातील दुसरे सर्वोत्तम पदार्पण ठरले आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध 22 षटकांत 33 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.

पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करणारे –
8/61 – नरेंद्र हिरवाणी विरुद्ध वेस्ट इंडिज, 1988
6/33 – मानव सुथार विरुद्ध अफगाणिस्तान, 2026
6/55 – सईद आबिद अली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1967
6/103 – दिलीप दोशी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1979
5/64 – वामन कुमार विरुद्ध पाकिस्तान, 1961

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---