ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने (INDvsAUS) बाजी मारली आहे. हैद्राबाद येथे रविवारी (25 सप्टेंबर) खेळला गेलेला हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला आहे. यामुळे तीन सामन्यांची ही टी20 मालिका भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली 2-1ने जिंकली आहे. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली आहे. हा सामना विराटसाठी विशेष ठरला आहे. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम करत राहुल द्रविड याला मागे टाकले आहे.
भारताचा कर्णधार-सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेविड (54) यांच्या अर्धशतकाच्या बळावर 7 विकेट्स गमावत 186 धावा केल्या. यावेळी भारताकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिली विकेट लवकरच गमावली. केएल राहुल 1 धाव करत बाद झाला. त्यानंतर काही अंतराने रोहित 17 धावा करत बाद झाला. तिसऱ्या क्रमांकाचा स्पेशालिस्ट अर्थातच विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीला आला. त्याने स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्या साथीने धावफलक हलता ठेवला.
विराटने अर्धशतक करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला मागे टाकले आहे. या सामन्यात विराटने 131.25च्या स्ट्राईक रेटने खेळताना 48 चेंडूत 63 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. ही खेळी करताना तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आधी द्रविड होता, मात्र त्याला विराटने मागे टाकले आहे.
विराटने 2008मध्ये पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये मिळून आतापर्यंत 24078 धावा केल्या आहेत. यामध्ये 71 शतके आणि 125 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने 1989-2013 या दरम्यान 34357 धावा केल्या आहेत. यामध्ये 100 शतके आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे, तर द्रविडने 24064 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. यामध्ये 48 शतके आणि 145 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघ आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरूअनंतपूरम येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये ‘असा’ विक्रम करणारा विराट पहिलाच! ऑस्ट्रेलियन दिग्गजाला टाकले मागे
बापू भारी छे! मालिकावीर अक्षरचे ऑस्ट्रेलियाला सापडले नाही उत्तर
हाताने बेल्स पडूनही मॅक्सवेल बाद! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ