---Advertisement---

INDvsNZ, 2nd Test: तिसऱ्या दिवसाखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड, न्यूझीलंड अद्याप विजयापासून ४०० धावा दूर

Team-India
---Advertisement---

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (५ डिसेंबर) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४५ षटकांत ५ बाद १४० धावा केल्या आहेत. अद्याप विजयासाठी न्यूझीलंडला ४०० धावांची गरज आहे, तर भारताला ५ विकेट्सची गरज आहे.

अश्विनच्या ३ विकेट्स

भारताने दुसरा डाव ७० षटकांत ७ बाद २७६ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील २६३ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि विल यंग यांनी डावाची सुरुवात केली होती. पण, त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. चौथ्या षटकात लॅथमला आर अश्विनने पायचीत बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. लॅथमने ६ धावा केल्या. यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंगला १५ व्या षटकात अश्विननेच २० धावांवर असताना राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद केले.

त्यानंतर १७ व्या षटकात अश्विनने दिग्गज रॉस टेलर याला चेतेश्वर पुजाराच्या हातून झेलबाद केले. टेलर केवळ ६ धावा करु शकला. याबरोबरच अश्विनने यावर्षी ५० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

पण यानंतर डॅरिल मिशेलला हेन्री निकोल्सने चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. दरम्यान ३० व्या षटकात मिशेलने कसोटीमधील त्याचे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर तो ३५ व्या षटकात अक्षर पटेलच्या चेंडूवर जयंत यादवकडे झेल देत ६० धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले.

तो बाद झाल्यानंतर टॉम बंडेल फलंदाजीसाठी आला. मात्र तो फार काही करु शकला नाही. त्याला श्रीकर भारत आणि वृद्धीमान साहाने मिळून धावबाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा अर्धा संघ माघारी परतला. अखेर दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रविंद्रने हेन्री निकोल्सला साथ देत आणखी पडझड होऊ दिली नाही.

त्यामुळे तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने ४५ षटकात ५ बाद १४० धावा केल्या. निकोल्स दिवसाखेर ३६ धावांवर नाबाद असून रचिन रविंद्र २ धावांवर नाबाद आहे.

भारताने दुसरा डाव केला घोषित

पहिल्या सत्राअखेर नाबाद असलेल्या शुबमन गिल आणि विराट कोहली या जोडीने दुसऱ्या सत्राची सुरुवात चांगली केली होती. दरम्यान, शुबमन ज्या लयीत खेळत होता, त्यावरुन तो अर्धशतक पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र, रचिन रविंद्रने त्याला ४७ धावांवर ६० व्या षटकात माघारी धाडले. त्यामुळे विराट आणि शुबमनची ८२ धावांची अर्धशतकी भागीदारी तुटली.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने फलंदाजीला येताच २ षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. मात्र, तो फार काळ टिकू शकला नाही. त्याला एजाज पटेलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टॉम बंडेलने ६२ व्या षटकात यष्टीचीत केले. श्रेयसने १४ धावा केल्या. त्यापाठोपाठ चांगल्या लयीत खेळणाऱ्या विराट कोहलीला रचिन रविंद्रने ६३ व्या षटकात त्रिफळाचीत करत माघारी धाडले. विराटने ३६ धावा केल्या.

यानंतर वृद्धिमान साहा एक बाजूने खेळत असताना अक्षर पटेलने दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळ केला. पण, साहाला १३ धावांवर रचिन रविंद्रने ६७ व्या षटकात १३ धावांवर बाद केले. तर, जयंत यादवला एजाज पटेलने ७० व्या षटकात जयंत यादवला आपल्याच चेंडूवर झेल घेत ६ धावांवर बाद केले. या विकेटबरोबरच भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात ७० षटकांत ७ बाद २७६ धावा केल्या. या डावात अक्षर पटेल २६ चेंडूत ४१ धावा करुन नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४ आणि रचिन रविंद्रने ३ विकेट्स घेतल्या.

मंयक-पुजाराची शतकी भागीदारी 

तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात २२ व्या षटकापासून आणि बिनबाद ६९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असणारी भारताची सलामी जोडी मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने अनुक्रमे ३८ आणि २९ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.

या दोघांनी तिसऱ्या दिवशीही चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी सुरुवातीला काही आक्रमक फटकेही खेळले. २६ व्या षटकात मयंकने एजाज पटेलच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि कसोटीतील त्याचे ५ वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर ३२ व्या षटकात एजाजनेच मयंकला विल यंगच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे त्याची आणि पुजाराची १०७ धावांची सलामी भागीदारी तुटली.

मयंक बाद झाल्यानंतर शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने चेतेश्वर पुजाराला चांगली साथ देण्यास सुरुवात केली. पण पुजारा ४७ धावांवर असताना ३६ व्या षटकात एजाज पटेलच्याच गोलंदाजीवर रॉस टेलरकडे झेल देऊन बाद झाला.

विशेष म्हणजे एजाज पटेलने आत्तापर्यंत या सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहे. भारताच्या पहिल्या डावातील सर्व १० विकेट्स त्यानेच घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावातील पहिल्या २ विकेट्सही त्यानेच घेतल्या आहेत.

पहिल्या दोन विकेट्स गेल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरुवात केली. दरम्यान ४४ व्या षटकात विराटच्या विकेटसाठी न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला होता. परंतु, हा रिव्ह्यू त्यांच्या विरोधात गेला.

पहिले सत्र संपले तेव्हा, भारताने ४६ षटकात २ बाद १४२ धावा केल्या आहेत. शुबमन गिल १७ धावांवर नाबाद आहे, तर कर्णधार विराट कोहली ११ धावांवर नाबाद आहे. सध्या भारताची आघाडी ४०५ धावा झाली आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला २६३ धावांची आघाडी मिळाली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---