भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामध्ये भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माच्या फलंदाजीची लय हरवलेली दिसली तर संघात परतलेला श्रेयस अय्यरही खास कामगिरी करू शकला नाही. त्याचाच परिणाम म्हणून दोघांनाही आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भारताचे आणखी दोन खेळाडू ज्यामधील एकाचे अव्वल स्थान हिसकावले गेले तर एक जण पहिल्या दहामध्ये दाखल झाला आहे.
भारताचा भरवशाचा फलंदाज-विकेटकीपर के एल राहुल याने अनेकदा संघाला संकटातून वाचवले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेतही उल्लेखनीय खेळी केली होती. एका बाजूने विकेट जात असताना त्याने दुसरी बाजू लढवत संघाचा धावफलक हलता ठेवला होता. यामध्ये त्याने ९२ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने गमावला मात्र राहुलने त्याच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. त्याचाच फायदा म्हणून त्याची आयसीसी वनडे क्रमवारीच्या पहिल्या दहामध्ये एंट्री झाली आहे. याआधी तो ११व्या स्थानावर होता.
भारताचा कर्णधार शुबमन गिल याने तीन सामन्यांत दोन अर्धशतके केली. याचे त्याला अधिक नुकसान झाले नाही. तो पाचव्याच स्थानावर आहे. मालिका सुरू असताना विराट पहिल्या स्थानावर आला होता, मात्र त्याला न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलकडून चांगलेच आव्हान मिळाले. दोघांनीही या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली.
मिचेल तर या मालिकेतील तिन्ही सामन्यांत उत्तम खेळला. त्याने मालिकेत सर्वाधिक अशा ३५२ धावा केल्या. यामुळे त्याने आयसीसी वनडेत फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. त्याने त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे. आतापर्यंत ५४ वनडे डाव खेळताना तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही.
यावरून आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या केवळ राहुलला फायदा झाला आहे. तसेच न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यालाही १६ स्थानांचा फायदा झाला आहे. त्यानेही इंदौरच्या वनडेत शतक केले होते. सध्या तो आयसीसी फलंदांजाच्या वनडे क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे.






