भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीचा काळ अतिशय खडतर होता. १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सुरुवातीच्या काळात भारतीय संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत होता. या कठीण काळात १९४७-४८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा देखील समावेश होता. या दौऱ्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने केवळ एक सामना अनिर्णित राखला होता, तर उर्वरित चार सामन्यात मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
खरंतर, विसरण्यासारखाच हा दौरा होता. मात्र एका खेळाडूसाठी हा दौरा लक्षात ठेवला गेला. या दौऱ्यात एका लहानश्या चणीचा विकेटकीपर चमकला होता. ज्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर पुढील पाच वर्षे सातत्याने भारतीय संघात स्थान मिळवले. या विकेटकीपरचे नाव होते प्रबीर कुमार सेन. आज त्यांचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने आजच्या लेखात आपण या विकेटकीपरविषयी जाणून घेऊया.
चपळ विकेटकीपर म्हणून मिळवली ओळख
भारतीय संघाने आपल्या सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमध्ये १२ सामन्यात ६ विकेटकीपर खेळवले होते. मात्र यानंतर तेराव्या कसोटी सामन्यात ज्या विकेटकीपरला संधी दिली, त्याने पुढील चौदा कसोटी सामन्यात सातत्याने ती भूमिका निभावली. १९४७-४८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची ही गोष्ट आहे. या दौऱ्यात तिसर्या सामन्यात प्रबीर कुमार सेन यांना पदार्पणाची संधी मिळाली. आणि त्यांनी या संधीचे सोने करत संघातील जागा पक्की केली.
प्रबीर कुमार सेन उंचीने लहान होते. त्यांची उंची केवळ ५ फूट ६ इंच होती. मात्र असे असूनही ते अतिशय चपळ आणि दक्ष विकेटकीपर होते. त्यांनी अनेक बहारदार झेल पकडले आणि वेगवान स्टंपिंग्ज देखील केल्या, ज्याचा भारतीय गोलंदाजांना फायदा झाला. या दौऱ्यातील पाचव्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने ५ बाद ५७५ धावसंख्येवर डाव घोषित केला होता. या डावात त्यांनी चार झेल पकडले होते. आणि केवळ चार अतिरिक्त धावा दिल्या होत्या.
माधव मंत्रींनी दिले आव्हान
ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर प्रबीर कुमार सेन वेस्ट इंडिजविरूद्ध मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळले. त्यानंतर १९५१-५२ सालच्या इंग्लंडविरुद्धच्या मद्रास कसोटीत त्यांनी अप्रतिम प्रदर्शन करता ऐतिहासिक विजयात योगदान दिले. या सामन्यात त्यांनी तब्बल पाच स्टंपिंग्ज केले. भारताचा हा पहिला कसोटी विजय होता.
मात्र त्यानंतर प्रबीर कुमार सेन यांना नाना जोशी आणि माधव मंत्री यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांनी आव्हान निर्माण करायला सुरुवात केली. १९५२ साली इंग्लंड दौर्यावर सेन यांच्यासह माधव मंत्रींना देखील खेळवले गेले. संघातून बाहेर जाण्यापूर्वी सेन यांनी १९५२-५३ सालचा पाकिस्तान दौरा देखील केला. मात्र त्यानंतर त्यांची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली.
सेन यांची कारकीर्द
प्रबीर कुमार सेन यांनी आपल्या चौदा कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत २० झेल पकडले आणि एकूण १४ स्टंपिंग्ज केले. मात्र फलंदाजीत त्यांनी फार खास प्रदर्शन केले नाही. त्यांची सर्वाधिक धावसंख्या २५ होती. जवळपास १९६० सालापर्यंत ते स्थानिक क्रिकेटमध्ये सक्रिय होते. मात्र २७ जानेवारी १९७० रोजी एक सामना खेळल्यानंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र आजही भारताच्या सुरुवातीच्या काळातील एक अव्वल विकेटकीपर म्हणून ते ओळखले जातात.
महत्त्वाच्या बातम्या –
तेलही गेलं अन् तूपही गेलं! अंतिम सामना गमावताच अश्विनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
आयपीएल तर संपली, पण टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! असंच सुरू राहिलं, तर विश्वचषकात होईल पंचायत