वर्ष २००९… त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न हा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. एके दिवशी अचानक वॉर्नने एका १९ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाला त्याच्या संघात स्थान दिले. एवढेच नव्हे तर, त्याने दावादेखील केला की, तो गोलंदाज १४० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करु शकतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्या गोलंदाजाकडे लागले होते. हा गोलंदाज म्हणजे, ‘कामरान खान’.
२००९ साली कामरानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्या पूर्ण हंगामात त्याला जास्त विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०१० मध्ये त्याने एका डावात आपल्या वेगवान गोलंदाजीने ब्रेंडन मॅक्यूलम आणि ख्रिस गेलसारख्या धाकड फलंदाजांना बाद केले. पण त्यानंतर आयपीएल २०११मध्ये त्याने २ सामने खेळले आणि पुढे तो गायब झाला.
पण अचानक आलेला आणि हवेसारखा निघून गेलेला हा खेळाडू नक्की होता तरी कोण? त्याने आयपीएलपर्यंतचा प्रवास नक्की कसा गाठला? हा प्रश्न सर्वांना सतावत असेल. चला तर जाणून घेऊया..
१० मार्च १९९१ रोजी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे कामरानचा जन्म झाला. त्याचे वडील जंगलातील लाकडे तोडण्याचे काम करत होते. कामरानला लहानपणीपासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याने गावातील गल्ली-बोळीत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तो २००९ पासून वेगवेगळ्या टी२० टूर्नामेंटमध्ये खेळू लागला. अशात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा देणारा एक दिवस उजाडला.
झाले असे की, आयपीएलच्या दूसऱ्या हंगामाची वेळ होती. त्यावेळी राजस्थान संघाचे प्रशिक्षण संचालक डॅरेन बेरी हे प्रतिभाशाली आणि नव्या दमाच्या खेळाडूंच्या शोधात होते. त्यासाठी ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गेले. तिथे एका टी२० टूर्नामेंटमध्ये त्यांनी कामरानला गोलंदाजी करताना पाहिले. विशेष म्हणजे, कामरानच्या गोलंदाजी शैलीमुळे बेरी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी कामरानला आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात आलेल्या आयपीएल २००९पुर्वी कॅप कोबरा संघाविरुद्ध राजस्थान संघाचा सराव सामना झाला होता. त्या सामन्यात कामरानने फलंदाज जस्टिन ऑनटॉन्गला यॉर्कर चेंडू टाकत त्रिफळाचीत केले होते. त्याच्या या अफलातून कामगिरीला पाहता कर्णधार शेन वॉर्न भलताच खुश झाला होता. त्यामुळे त्याने मीडियासमोर घोषणा केली होती की, “कामरान त्याच्या वेगाने आणि धारदार गोलंदाजीने आयपीएलमध्ये धमाका करेल. एवढेच नव्हे तर, तो भविष्यात भारतीय संघाचा स्टार गोलंदाज म्हणून नावारुपाला येईल,” असेही त्याने म्हटले होते.
पण कामरान वॉर्नच्या अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही. त्याने आयपीएलमध्ये ८ सामने खेळत फक्त ९ विकेट्स घेतल्या.
असे असले तरी, त्याला पुढे २०१३ साली उत्तर प्रदेश प्रथम श्रेणी क्रिकेट संघात स्थान मिळाले. मात्र तो केवळ २ सामन्यात ५ विकेट्सची कामगिरी करुन संघाबाहेर झाला. त्यानंतर पुन्हा त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही आणि अखेर वयाच्या २३व्या वर्षी त्याने क्रिकेटला सोडण्याचा निर्णय घेतला. आता कामरान त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या गावात शेती करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल २०२०: ‘या’ खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे ट्रोल झाली पत्नी; मग काय दिले सडेतोड प्रत्युत्तर
एकाच चेंडूवर दोनदा रिव्ह्यू? मुजीबच्या विकेटने वाढवला गोंधळ, पाहा नक्की काय आहे प्रकरण
ट्रेंडिंग लेख-
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम