आयपीएलच्या दुसर्या हंगामातील म्हणजे २००९ सालातील ही गोष्ट. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य संघांमध्ये पहिला सामना खेळवला जात होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई प्रथम फलंदाजी करत होती. या डावात सचिनने कप्तानी खेळी करतांना नाबाद ५९ धावा केल्या होत्या. मात्र या डावात मुंबईच्या एका खेळाडूने अवघ्या ४ चेंडूत सामन्याचा नूर बदलला होता. १५व्या षटकात मैदानात आलेल्या या खेळाडूने १७व्या षटकात ४ चेंडूत ३ षटकार ठोकले होते. त्याच्या १३ चेंडूंतील ३५ धावांच्या खेळीमुळे मुंबईने १६६ धावांचे लक्ष्य चेन्नईला दिले होते. जे लक्ष्य गाठण्यात चेन्नईला अपयश आले आणि मुंबईने विजय मिळवला.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार सचिन तेंडुलकरला देण्यात आला होता. मात्र खऱ्या अर्थाने २५ वर्षीय या युवा खेळाडूच्या आक्रमक खेळाडूच्या कामगिरीने सामना मुंबईच्या पक्षात झुकला होता. या फलंदाजाचे नाव होते अभिषेक नायर. एकेकाळी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या हा अष्टपैलू खेळाडू नंतर विस्मृतीत गेला. आजच्या या लेखात आपण त्याच्याच कारकीर्दीचा आढावा घेऊया.
पाकिस्तानात जाऊन ठोकले होते पहिले प्रथम श्रेणी शतक
मूळच्या केरळचा असलेल्या अभिषेक नायरने २००५ साली मुंबईकडून पदार्पण केले. मात्र त्याची छाप सर्वप्रथम २००६ साली पडली. त्यावर्षी त्याने फलंदाजीत उपयुक्त योगदान दिले होते व मुंबईला विजेतेपद जिंकवून देण्यात वाटा उचलला होता. या हंगामात त्याचे पहिले शतक अवघ्या तीन धावांनी हुकले होते. मात्र त्यानंतर काहीच महिन्यात त्याने ही कमी पूर्ण केली होती.
विशेष म्हणजे हे शतक, भारतात नाही तर पाकिस्तानात झळकवले होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोहम्मद निसार ट्रॉफी खेळवली जायची. यात दोन्ही देशांचे फर्स्ट क्लास विजेत्या संघामध्ये सामना व्हायचा. याच सामन्यात अभिषेक नायरने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले होते. त्याने सहाव्या क्रमांकावर येत १५२ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळाली होती आणि याच जोरावर त्यांनी सामना देखील जिंकला होता.
मुंबईचा ‘रणजी धुरंधर’
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिषेक नायर हा मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक होता. रणजी स्पर्धेत मुंबईने मिळवलेल्या यशात अभिषेकचा नेहमीच मोलाचा वाटा होता. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अभिषेक मोक्याच्या क्षणी भागीदारी फोडून विकेट पटकावण्यात माहीर होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०३ सामन्यात १७३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच डावखुरा फलंदाज म्हणून तो सहाव्या-सातव्या क्रमांकावर उपयुक्त खेळी करत असायचा. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५.६२च्या सरासरीने ५७४९ धावा धावा काढल्या होत्या. ज्यात १३ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या याच खासियत मुळे पाच वेळच्या रणजी विजेत्या मुंबईच्या संघाचा तो भाग होता.
आयपीएलचा देखील होता भाग
अभिषेक नायरला २००८-०९ सालच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. इथेही पहिल्या काही सामन्यात त्याने निर्णायक योगदान दिले होते. या स्पर्धेत त्याने ६० सामने खेळले, ज्यात ६७२ धावा काढल्या आणि ९ विकेट्स देखील पटकावल्या. मुंबई इंडियन्स शिवाय तो आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स कडून देखील खेळला आहे.
भारतीय संघाकडून फार मिळाली नाही संधी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या अभिषेक नायरला मुंबई कडून मात्र पुरेशी संधी मिळाली नाही. जून २००९ मध्ये वेस्ट इंडिज दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचा तो भाग होता. तिथे त्याने तीन सामने खेळले ज्यातील एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली. यात तो सात चेंडू खेळून एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघाकडून संधी मिळाली नाही.
अभिषेक नायरने मुंबईकडून एकूण ९९ प्रथम श्रेणी सामने खेळले. मात्र १००वा सामना खेळण्याआधीच त्याला खराब फॉर्म मुळे संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याला मुंबईच्या संघात देखील स्थान मिळाले नाही. अशा परिस्थितीत तो पुड्डुचेरीच्या संघाकडून काही काळ खेळला. मात्र त्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
आता अभिषेक नायर क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतो. दिनेश कार्तिकने त्याच्या खेळातील सुधारणेचे श्रेय अनेकदा जाहीरपणे अभिषेक नायरला दिले आहे. कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल संघाचा अभिषेक अॅकॅडमी प्रशिक्षक देखील आहे. कार्तिक सारख्या खेळाडूंचा तो मेंटॉर तर आहेच, याशिवाय श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यासारख्या खेळाडूंनाही तो मार्गदर्शन करत असतो.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..