– शारंग ढोमसे
भारतीय कबड्डी महासंघाने भारतीय संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पंकज मोहिते आणि शुभम शिंदे यांना या यादीत स्थान मिळाले. महिला गटात सोनाली शिंगटे,नेहा घाडगे आणि मेघा कदम या मराठी खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले. मात्र ६७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करूनही सोनाली हेळवीला या यादीत स्थान दिले गेले नाही. विशेषतःरेल्वे सारख्या बलाढ्य संघांविरुद्ध सोनालीने केलेल्या अत्यंत उत्कृष्ट खेळानंतरही तिचा संभाव्य यादीत समावेश करण्यात येऊ नये हे दुर्देव आहे.
महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात सोनालीला संघात स्थान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सोनाली महाराष्ट्राची खेळाडू असल्याने स्वाभाविकपणे महाराष्ट्र कबड्डी वर्तुळातील प्रत्येकाला तिची निवड व्हायला हवी होती हे वाटणारच. मात्र भावनिक मुद्दा बाजूला ठेवून कामगिरीच्या आधारावर आणि आकडेवारी, कौशल्य या गोष्टी लक्षात घेता खरंच सोनालीची निवड होणे अपेक्षित होते का हे बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच आजचा हा लेखप्रपंच आहे.
आता कुठल्याही खेळाडूच्या कामगिरीचे पूर्णपणे मूल्यमापन फक्त आकडेवारीवर होऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी कामगिरीचे मूल्यमापन करण्याचा अकडेवारीपेक्षा अधिक उत्तम मार्ग दुसरा नाही. त्यामुळे आपण संभाव्य संघाच्या यादीतील खेळाडूंची ६७ व्या राष्ट्रीय स्पर्धेतील आकडेवारी बघणार आहोत.
महिलांच्या संभाव्य संघात एकूण ३६ खेळाडूंची निवड झाली आहे. तर २ खेळाडू हे राखीव म्हणून निवडण्यात आले आहेत. यात १४ चढाईपटूंचा समावेश आहे.कारण की सोनाली ही एक चढाईपटू आहे त्यामुळे आपण सोनाली आणि यादीत निवड झालेल्या चढाईपटूंच्याच कामगिरीची आढावा इथे घेणार आहोत. म्हणजेच यात आपण अष्टपैलू किंवा बचावपटूंचा समावेश करत नाही आहोत.
१. स्पर्धेत मिळवलेले एकूण गुण:
सर्वप्रथम आपण खेळाडूने स्पर्धेत मिळवलेल्या एकूण चढाईच्या गुणांवर नजर टाकूयात. वरील तक्त्यानुसार एकूण चढाईच्या गुणांबाबत सोनाली हेळवीने मध्य प्रदेशाच्या कांचन ज्योती आणि हरयाणा च्या लीना पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत. म्हणजेच या आकडेवारीनुसार कांचन ज्योती आणि लीना यांच्याआधी सोनालीची निवड होणे रास्त ठरते.
२. सामन्यागणिक सरासरी चढाईचे गुण:
खेळाडूंनी मिळवलेले एकूण गुण आपण बघितलेत मात्र प्रत्येक खेळाडूला सारखेच सामने खेळायला मिळालेले नाहीत. यात काहींनी २ तर काहींनी ३-४ सामने खेळले आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने एका सामन्यात सरासरी किती गुण मिळवलेत हे लक्षात घेऊयात. सोनालीने ५ ची सरासरी राखत २ सामन्यांत १० गुण मिळवले आहेत. या ठिकाणी सुद्धा कांचन ज्योती हिचे सरासरी गुण केवळ २.५ आहे तर लीनाच्या नावावर गुणच नसल्यामुळे तिची सरासरी ० आहे. तर तेलंगणाच्या शेक नौशीणची सरासरी सोनाली इतकीच म्हणजे ५ आहे. म्हणजेच या आकडेवारीनुसारसुद्धा सोनालीची निवड या ३ खेळाडूंच्या आधी होणे अपेक्षित होते.
३. विरोधी संघाचा दर्जा:
खेळाडूने किती गुण मिळवले हे महत्त्वाचे असतेच मात्र त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते की त्याने ते कोणत्या संघाविरुद्ध मिळवलेत. बलाढ्य संघांविरुद्ध खेळाडूचा खरा कस लागत असतो त्यामुळे त्या एखाद्या कमकुवत संघाविरुद्ध मिळवलेल्या १० गुणांपेक्षा बलाढ्य संघांविरुद्ध मिळवलेले ५ गुणदेखील अधिक श्रेष्ठ ठरतात. आता वरील २ तक्त्यांनुसार सोनालीच्या बरोबरीने किंवा मागे असणाऱ्या ३ खेळाडूंचाच विचार करूया. सोनालीने मिळवलेल्या १० गुणांपैकी ०९ गुण हे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ रेल्वेविरुद्ध आले आहेत. तर तेलंगणाच्या शेक नौशीण हिचे सगळ्यात जास्त गुण तुलनेने कमकुवत असलेल्या ओडिशा, कर्नाटक या संघांविरुद्ध आलेले आहेत. बाकी दोन खेळाडूंचे गुण तर नगण्यच आहेत. म्हणजे इथेसुद्धा सोनाली सरस ठरते.
हरयाणाच्या लीनाला लॉटरी !
ही आकडेवारी बघतांना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हरयाणाच्या लीना या खेळाडूच्या खात्यावर एकही गुण नाही. मुळात ती एकही सामना खेळलीच नाही. हरयाणाच्या सर्व सामन्यांत ती राखीव खेळाडू होती. त्यामुळे एकही सामना न खेळलेल्या राखीव खेळाडूला भारतीय संघाच्या संभाव्य यादीत स्थान देण्याचा धक्कादायक प्रकार निवड समितीने केला आहे.
या सगळ्याचा सारांश असाच की शेक नौशीण,कांचन ज्योती किंवा लीना या ३ खेळाडूंपैकी कोणाच्याही ऐवजी सोनालीची निवड सहज करता येऊ शकली असती. अर्थात,संभाव्य यादीत स्थान मिळवल्यानंतर सोनालीला अंतिम संघात स्थान मिळणे जवळ जवळ अशक्यच होते. त्यासाठी तिला अजून बराच प्रवास करायचा आहे. भारतीय संघाच्या शिबिराला उपस्थित राहून तो अनुभव गाठीशी बांधण्याची संधी तिच्याकडून हिरावून घेतली गेली हे मात्र निश्चित !