---Advertisement---

विजयाच्या हॅट्रिकसह भारत करणार का अंतिम फेरीतील स्थान निश्चित?

On: गुरूवार, जून 7, 2018 7:25 PM
---Advertisement---

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेचे साखळी सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. अवघे २ सामने बाकी असताना सुद्धा अंतिम सामना कोण खेळणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर हे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. सध्या गुणतालिकेत भारत २ सामन्यात २ विजयासह पहिल्या तर न्यूझीलंड २ सामन्यात १ विजय आणि १ पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे.

जर आजचा सामना भारताने जिंकला किंवा बरोबरीत सोडवला तर भारताचे अंतिम सामन्यातील स्थान निश्चित होईल.

आजच्या सामन्यातील विजयानंतर भारताचे ३ सामन्यात ३ विजयासह ९ गुण घेऊन आपले पहिले स्थान निश्चित करेल आणि जर सामना बरोबरीत सुटला तरी सुद्धा भारताला १ गुण मिळेल आणि ७ गुणांसह पहिले स्थान कायम राहील.

तर दुसरीकडे न्यूझीलंडसाठी हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. या सामन्याचा निकाल त्यांचे या स्पर्धेतील भवितव्य ठरवेल.

जर न्यूझीलंडने सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे सुद्धा भारताबरोबरच ६ गुण होतील आणि सामना अनिर्णित राहिला तर त्यांना ४ गुणांवर समाधान मानावे लागेल. अश्या परिस्थितीत त्यांना दुसऱ्या संघांच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागेल.

भारताचे या स्पर्धेतील प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट झाले आहे. दोन सामन्यात ८ गोल केले असून प्रतिस्पर्धी संघाला १ सुद्धा गोल करू दिलेला नाही.

भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने २ सामन्यात ५ गोल्स केले आहेत तर जेजे, उदांता, आणि प्रणॉयने सुद्धा प्रत्येकी एक गोल केला आहे.

मागील सामन्यातील हिरो संदेश झिंगन या सामन्यात खेळण्याचे खूप कमी चिन्ह आहेत. मागील सामन्यात सुनील छेत्रीचे १०० सामने पूर्ण झाले आणि आज जर जेजेला खेळवले तर त्याचा हा ५०वा सामना असेल.

आपल्या पहिल्या सामन्यातील केनिया बरोबरच्या पराभवाला विसरून न्यूझीलंडने चिनी ताईपेचा १-० ने पराभव करत पुन्हा एकदा लय प्राप्त केली आहे.

त्यांच्या या विजयानंतर त्यांच्या सुरवातीच्या ११ खेळाडूंमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही. आजच्या विजयानंतरसुद्धा त्यांना केनियाच्या पराभवाची किंवा कमी गोल फरकाने विजयची गरज आहे.

काय आहेत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठीची प्रत्येक संघाची समीकरणे :-

भारत :- विजय किंवा सामना बरोबरीत सुटला तर थेट प्रवेश. पराभव झाला तर गोलफरकाच्या बळावर होऊ शकतो प्रवेश.

न्यूझीलंड :- विजय आवश्यक. पराभव झाला किंवा बरोबरीत सुटला तर केनियाच्या पराभवाची गरज.

केनिया :- विजय आवश्यक. पराभव झाला किंवा बरोबरीत सुटला तर न्यूझीलंडच्या पराभवाची गरज.

चिनी ताईपे :- मोठ्या गोलफरकाने विजय आवश्यक. विजयानंतर सुद्धा न्यूझीलंडच्या मोठ्या पराभवाची गरज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment