क्रिकेट सामन्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये नेहमीच स्पर्धा पहायला मिळते. पण याबरोबर एकाच संघातील २ खेळांडूमध्येही सर्वात चांगली कामगिरी करण्यासाठी स्पर्धा असते. जर एकाच संघातील २ खेळाडू सारख्याच त्वेषात आणि सारख्याच क्षमतेने खेळ करत असतील तर त्यांच्यात चांगली कामगिरी करण्यासाठी मैत्रीपूर्ण चढाओढ असते.
त्यामुळे त्यांच्या संघालाही मोठा फायदा होतो. तसेच त्यांना वैयक्तिकरित्याही त्यांची चांगली कामगिरी होण्यास मदत होते. तसेच त्यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध असतीत तर ही कामगिरी आणखी बहरण्यास मदत होते. अशाच चांगल्या कामगिरीसाठी एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण चढाओढ असणाऱ्या खेळाडूंच्या जोड्या –
१. वकार युनुस आणि वसिम आक्रम –
पाकिस्तान संघातील वकार युनुस आणि वसिम आक्रम या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने अनेक फलंदाजांना घाम फोडला आहे. त्यांनी नवीन आणि जून्या असे दोन्ही चेंडू लिलया हाताळताना चांगली कामगिरी केली आहे. या दोघांंनी मिळून १७०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच या दोघांकडेही चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याची कला होती. त्या दोघांची गोलंदाजीतील भागीदारीही चांगली झाली आहे. युनुसने १९८९ ला तर आक्रमने १९८५ ला पदार्पण केले होते. तसेच त्या दोघांनीही २००३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
तसेच त्या दोघांचाही १९९२ च्या विश्वविजेत्या पाकिस्तान संघात समावेश होता. त्याचबरोबर १९९९ ला विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या पाकिस्तान संघाकडूनही ते एकत्र खेळले.
२. कर्टली अँब्रॉस आणि कर्टनी वॉल्श –
क्रिकेटमध्ये सर्वाधिक गाजलेल्या गोलंदाजांच्या जोडींमध्ये कर्टली अँब्रॉस आणि कर्टनी वॉल्श या वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांच्या जोडीचा समावेश होतो. या दोघांनी भागीदारी करताना कसोटीत ७५७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्यामध्ये नेहमीच एकमेकांशी चांगल्या कामगिरीसाठी स्पर्धा पहायला मिळाली.
त्यांच्यातील ही स्पर्धा त्यांना क्रिकेटमधील एक दिग्गज वेगवान गोलंदाज बनवण्यासाठी पुरेशी ठरली. त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अनेकदा प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. तसेच निवृत्तीनंतर त्या दोघांनीही त्यांच्यातील मैत्रीने त्या दोघांना चांगली कामगिरी करण्यास मदत केल्याचे मान्य केले.
३. विराट कोहली आणि रोहित शर्मा
सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणारे फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. मागील काही वर्षापासून त्यांच्यात सर्वाधिक धावा करण्यासाठी मैत्रीपूर्ण स्पर्धा पहायला मिळाली आहे. या दोघांनीही मागील ३ वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. पण असे असले तरी ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
त्यांच्यातील भागीदारीही अनेकदा चांगली झाली आहे. तसेच भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा विराट कर्णधार तर रोहित उपकर्णधार आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची धूराही ते उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत.
त्यांनी एकत्र खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११९ डावात ५८.२१ च्या सरासरीने ६५७८ धावांची भागीदारी केली आहे. यामध्ये त्यांनी २४ वेळा शतकी तर २१ वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.
४. डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल –
दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केलमध्येही अशीच मैत्रीपूर्ण स्पर्धा पहायला मिळाली. त्या दोघांकडेही सातत्याने एकाच लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. स्टेनकडे वेग आहे. तर मॉर्केल वेगासह चेंडूला चांगली उसळी देऊ शकतो. त्यामुळे या जोडीच्या विरुद्ध फलंदाजांना धावा करण्यास जड जात होते. या दोघांनी कसोटीत एकत्र गोलंदाजीत भागीदारी करताना ५०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
५. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन –
सध्या इंग्लंडच्या कसोटी संघात सक्रिय असलेली दिग्गज वेगवान गोलंदाजांची जोडी म्हणजे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड. मागील अनेक वर्षापासून या दोघांनीही एकत्र खेळताना अनेक फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले आहे. त्या दोघांमध्येही चांगली कामगिरी करण्यासाठी आणि विकेट्स घेण्यासाठी मैत्रीपूर्ण चढाओढ असते.
त्या दोघांनी मिळून कसोटीमध्ये गेल्या १३ वर्षात १००० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच असे असले तरी ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. याच मैत्रीमुळे त्यांच्याकडून चांगली कामगिरी होण्यास त्यांना मदतही होते.
ट्रेंडिंग लेख –
पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मॅन ऑफ द सिरीज ठरलेले ३ भारतीय खेळाडू, एक आहे २० वर्षांचा