पुणे: खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळूरु रायनोज संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 39-32 असा विजय मिळवला.
पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत बंगळूरु रायनोस व पाँडिचेरी प्रिडेटर्स संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सामन्याच्या सुरुवातीलाच बंगळूरु रायनोज संघाने 3-2 अशी आघाडी घेतली होती. यानंतर बराच वेळाने बंगळूरुच्या बचावफळीने सोनूला बाद करत 4-2 अशी आघाडी घेतली. यानंतर बंगळूरुच्या चढाईपटूंनी चमक दाखवत 12-3 पर्यंत नेली. त्यामुळे पहिल्या क्वॉर्टरपर्यंत बंगळूरुकडे 13-5 अशी आघाडी होती. दुस-या क्वॉर्टरमध्ये पाँडिचेरी संघाचा कर्णधार आर. सुरेश कुमार याने आक्रमक चढाया करत एकवेळ आघाडी 13-10 कमी केली. पण, बंगळूरुच्या चढाईपटूंनी गुणांची कमाई करत मध्यंतरापर्यंत 20-17 अशी आघाडी घेतली.
तिस-या क्वॉर्टरमध्ये बंगळूरु संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या चढाई व बचावफळीने चांगला खेळ करत सलग सात गुणांची कमाई करत संघाला 27-17 अशी आघाडी मिळवून दिली. बंगळूरुच्या अरुमुगम व विपिन मलिक यांनी चांगला खेळ करत तिस-या क्वॉर्टरअखेरपर्यंत संघाला 31-23 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाले. पाँडिचेरी संघाचा आघाडी कमी करण्यावर भर होता. बंगळुरु संघाने आपली आघाडी 38-30अशी कायम ठेवली. पाँडिचेरी संघाकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न झाले पण, त्यांना यश मिळाले नाही. अखेर बंगळूरुने सामना 39-32 असा आपल्या नावे केला.