पुणे: संदीप चिल्लर व हरदीप चिल्लर यांच्या चढाया आणि विपुल मोकल व मनीष यांच्या बचावाच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात दिलेर दिल्ली संघाने चेन्नई चॅलेंजर्स संघावर 52-30 अशा फरकाने विजय मिळवला.
बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच दिलेर दिल्ली संघाने आक्रमक खेळ करत चेन्नई चॅलेंजर्स संघावर वर्चस्व प्रस्थापित केले.पहिल्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाकडे 10-6 अशी आघाडी होती. यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाने आक्रमक पवित्रा घेत चेन्नई संघाला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.त्यांच्या संदीप चिल्लर व हरदीप चिल्लर यांनी चढाईत चमक दाखवत दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलेर दिल्ली संघाने 21-3 अशी आघाडी घेत मध्यंतरापर्यंत 32-11 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये चेन्नई चॅलेंजर्स संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुणांची कमाई केली तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी 9-9 अशी समान गुणांची कमाई केली.तरीही दिल्ली संघाने आपली आघाडी 40-18 अशी कायम ठेवली. दिल्लीच्या संघाला विजय मिळवण्यासाठी केवळ आपली आघाडी कायम ठेवण्या पलीकडे दुसरे काही करण्याची गरज नव्हती.चेन्नईचा संघ हा सर्वच स्तरावर दिल्लीच्या मागे राहिला.दिल्लीकडून विपुल मोकल व मनीषने जोरदार पकडी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. या सर्वांच्या खेळामुळे दिल्लीला 50 चा आकडा गाठता आला.