आज कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
बँगलोर संघाने कोलकाता समोर विजयासाठी २० षटकात १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ख्रिस लिनने(५) त्याची विकेट लवकर गमावली. त्यानंतर नारायणने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याला रॉबिन उथप्पाने चांगली साथ दिली.
नारायणने १७ चेंडूंतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील चौथ्या क्रमांकाचे जलद अर्धशतक आहे. त्याने आज १९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. नारायण बाद झाल्यावर काही वेळानंतर उथप्पाही(१३) बाद झाला.
त्यानंतर मात्र कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितीश राणाने कोलकाताचा डाव सांभाळत विजयाचा मार्ग सुकर केला. पण खेळपट्टीवर स्थिर झालेला असतानाच राणाने(३४) विकेट गमावली. त्याच्यानंतर काही वेळातच रिंकू सिंग(६) आणि आंद्रे रसलही(१५) बाद झाले. पण तो पर्यंत कोलकाता विजयाच्या समीप पोहचली होती. अखेर उरलेल्या धावा १८.५ षटकात पूर्ण करून कार्तिक(३५*) आणि विनय कुमारने(६*) कोलकाताचा विजय निश्चित केला.
बँगलोरकडून ख्रिस वोक्स(३/३६), उमेश यादव(२/२७) आणि वॉशिंग्टन सुंदर(१/४८) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, बँगलोरने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून आज ब्रेंडन मॅक्युलम(४४) आणि एबी डिव्हिलियर्स(४४) यांनी आक्रमक खेळ केला. या दोघांनाही कर्णधार विराट कोहलीने(३१) भक्कम साथ दिली. तर अखेरच्या काही षटकात मंदीप सिंगने(३७) सर्फराज खान(६) आणि ख्रिस वोक्सला(५) साथीला घेत बँगलोरला १७६ धावांची धावसंख्या गाठून दिली.
कोलकाताकडून नितीश राणा(२/११), विनय कुमार(२/३०), पियुष चावला(१/३१), सुनील नारायण(१/३०) आणि मिशेल जॉन्सन(१/३०) यांनी विकेट घेतल्या.