हैद्राबाद। काल राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात चेन्नईने 4 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अंबाती रायडू आणि सुरेश रैनाने अर्धशतकी खेळी केली.
रैनाने काल 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच रैनाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा त्याचा जुना विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर केला आहे. रैनाच्या आता आयपीएलमध्ये 165 सामन्यात 34.25 च्या सरासरीने 4658 धावा झाल्या आहेत.
आयपीएलचा 11 वा सोसम सुरू होण्याआधी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रैनाच्याच नावावर होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात नाबाद 92 धावांची खेळी करताना हा विक्रम त्याच्या नावावर केला होता.
विराटने 154 आयपीएल सामन्यात 38.11 च्या सरासरीने 4649 धावा केल्या आहेत. आता रैना आणि विराट या दोघांमध्ये फक्त 9 धावांचा फरक आहे. त्यामुळे या दोघांमध्ये हा विक्रम नावावर करण्यासाठी चांगलीच स्पर्धा बघायला मिळणार आहे.
त्यातच बेंगलोर आणि चेन्नई संघांचा पुढील सामना एकमेकांविरूद्धच होणार आहे. हा सामना 25 एप्रिलला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.




