आयपीएलचा १३ वा सत्र युएईमध्ये सुरु झाला आहे. तेथे खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहेत. त्याशिवाय युएई मधील मैदानेही खूप मोठी आणि लांब असल्याने कोणत्याही फलंदाजाला तिथे मोठे शॉट्स खेळणे सोपे नाही. फलंदाजांना लांब फटके खेळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
यंदा आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असेल. ते गोलंदाज खूप प्रभावी ठरू शकतात. या आयपीएल हंगामात, ज्या संघात सर्वोत्कृष्ट फिरकीपटू असतील त्यांची सामन्यावर अधिक पकड असेल. तसे, सर्व संघांकडे बरेच चांगले फिरकीपटू आहेत.
या आयपीएलमध्ये गोलंदाज यशस्वी होऊ शकतात.
या लेखात अशा ३ भारतीय गोलंदाजांविषयी सांगू ज्यांना या आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी मिळू शकतात. आयपीएलच्या या हंगामात हे गोलंदाज त्यांच्या संघासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. चला जाणून घेऊया ते ३ भारतीय गोलंदाज कोण आहेत.
या आयपीएल मोसमात सर्वाधिक विकेट मिळवू शकणारे ३ भारतीय गोलंदाज
३. श्रेयस गोपाळ – राजस्थान रॉयल्स
श्रेयस गोपाळ एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे. आयपीएल सामन्यात त्याने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गज खेळाडूंना बाद केले. जगातील सर्वात मोठ्या फलंदाजासाठीसुद्धा त्याची गुगली समजणे सोपे नाही.
श्रेयस गोपाळने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३१ सामने खेळले असून या काळात त्याने ३८ बळी घेतले आहेत. १६ धावा देऊन ४ बळी मिळविणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. युएईच्या खेळपट्यांवर श्रेयस गोपाळ हा एक चांगला गोलंदाज असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊ शकतो.
राजस्थान संघाचा पहिला सामना चेन्नई सोबत २२ सप्टेंबर रोजी आहे. श्रेयस या सामन्यात खेळला तर कशी कामगिरी करतो, ते पाहणे रोमांचक ठरेल.
२.युजवेंद्र चहल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
आयपीएलचा हा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलसाठी महत्वाचा ठरेल. तो घराच्या मैदानावर फलंदाजांना आपल्या जाळ्यात काडकावयाचा आणि बळी मिळवायचा. आता युएईमध्ये त्याच्यासाठी बळी मिळवणे ही गोष्ट अधिक सोपी होईल. वास्तविक दुबई हे यावेळी आरसीबीचे होम ग्राऊंड असेल. तेथील मैदान खूप मोठे आहे. म्हणूनच युजवेंद्र चहलविरुद्ध कोणत्याही फलंदाजास मोठे फटकेबाजी करणे सोपे होणार नाही. युझवेंद्र चहल फलंदाजाला मोठ्या शॉटसाठी भाग पडतो. पण त्याचा चेंडू दुबईच्या मोठ्या मैदानाच्या सीमारेषाबाहेर पाठविणे सोपे होणार नाही. याच कारणास्तव चहल या मोसमात सर्वाधिक बळी घेऊ शकतो.
१. जसप्रीत बुमराह – मुंबई इंडियन्स
या आयपीएल मोसमात जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज असू शकतो. लसिथ मलिंगा हा आयपीएल हंगाम न खेळल्याने गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर अधिक आहे. बुमराह सर्वोत्तम यॉर्कर्स चेंडू टाकण्यास सक्षम आहे आणि युएईच्या मैदानावर तो यशस्वी होऊ शकतो.
परंतु नुकत्याच झालेल्या सलामीच्या सामन्यात त्याने ४ षटके टाकत सर्वाधिक ४३ धावा दिल्या आणि एक गडी बाद करण्यात त्याला यश आले. पण पुढील होणाऱ्या सामन्यात तो प्रभावी गोलंदाजी करू शकतो.