कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या योगदानालाही फार महत्त्व असते. क्रिकेटमध्ये असे बरेचदा होते की फलंदाज तुम्हाला एक किंवा दोन सामने जिंकू शकतात, परंतु जर तुम्हाला एखादी मालिका किंवा मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याशिवाय मोठी स्पर्धा संघ जिंकू शकत नाही.
हीच गोष्ट जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेतही म्हणजे आयपीएलमध्येही लागू आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये जिंकलेल्या सर्व संघांच्या बाबतीत विचार करायला गेलो तर फलंदाजीसोबतच त्यांच्या गोलंदाजांचेही तत्यांच्या यशात मोठे योगदान होते.
आरसीबी संघाचे उदाहरण घेतले तर त्यांच्या फलंदाजांनी प्रत्येक हंगामात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, परंतु त्यांच्या खराब गोलंदाजीमुळे त्यांना एकही विजेतेपद मिळवता आले नाही. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ या दोन्ही संघाची फलंदाजी जितकी मजबूत आहे तितकीच गोलंदाजी देखील मजबूत आहे. म्हणूनच हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानले जातात.
यंदाच्या आयपीएल हंगामातही असे बरेच संघ आहेत ज्यांची गोलंदाजी खूप मजबूत आहे. या लेखात आपण त्या ३ संघांबद्दल जाणून घेऊ ज्यांची या हंगामात गोलंदाजी मजबूत आहे.
आयपीएल २०२० मधील ३ सर्वोत्कृष्ट गोलंदाजी असलेले संघ
३. कोलकाता नाइट रायडर्स
आयपीएलच्या या हंगामात अद्याप केकेआरची कामगिरी बऱ्यापैकी झाली आहे, परंतु त्यांच्या गोलंदाजांनी सर्वांना प्रभावित केले आहे.
केकेआरच्या गोलंदाजीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे आयपीएलमध्ये सर्वात महाग असलेला परदेशी गोलंदाज आहे, तर बरेच भारतीय युवा गोलंदाज आहेत. पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि कुलदीप यादव या गोलंदाजांनी केकेआर संघाची गोलंदाजी सांभाळली आहे.
शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कमलेश नागरकोटीच्या आगमनानंतर संघाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. या संघाने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत ५ सामन्यांपैकी ३ सामने जिकंले आहेत, तर एक सामना गमावला आहे.
२. दिल्ली कॅपिटल्स
या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजीही बरीच मजबूत आहे आणि म्हणूनच ते सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसर्या क्रमांकावर आहेत. या संघात अनुभवी फिरकीपटूंची फौज आहे. रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि संदीप लामिछाने हे फिरकीपटू आहेत. दुखापतीमुळे अमित मिश्रा या हंगामातून बाहेर आला आहे परंतु त्याची कमतरता दिल्लीला जाणवणार नाही. त्याचबरोबर संदीप लामिछाने याला अद्याप संधी मिळाली नाही.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीबद्दल जर आपण बोललो तर कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए जवळपास १५० च्या वेगाने गोलंदाजी करतात. रबाडाने या मोसमात आतापर्यंत ५ सामन्यांत १२ बळी घेतले असून पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. एन्रिच नोर्किएने ७ विकेट्स घेतल्या आहेत. एकूणच दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी खूप चांगली आहे.
१. मुंबई इंडियन्स
या यादीत मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यांची गोलंदाजी सर्वात आक्रमक दिसत आहे. या संघात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय जेम्स पॅटिन्सनसुद्धा चांगली गोलंदाजी करत आहे. बुमराहने ६ सामन्यांत ११ आणि बोल्टची १० बळी घेतले आहेत.
आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये टॉप ५ मध्ये मुंबई इंडियन्सचे ३ गोलंदाज आहेत. हीच त्यांच्या गोलंदाजीच्या आक्रमणाची गुणवत्ता आहे. या कारणास्तव, मिशेल मॅक्लेनाघनसारख्या गोलंदाजाला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.